औरंगाबाद - दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे लोकमतच्या वाटेवर आहेत. लोकमतच्या पुणे आवृत्तीच्या संपादक पदाची सूत्रे आवटे येत्या ७ फेब्रुवारी रोजी घेणार आहेत. दरम्यान , आवटे यांच्या जागी औरंगाबादेत दिव्य मराठी मध्ये सध्या भोपाळमध्ये असलेले प्रणव गोळवलकर जॉईन होणार आहेत.
सकाळ - पुणे ( प्रशिक्षणार्थी उपसंपादक ) संचार - सोलापूर ( वृत्तसंपादक ), लोकमत - अकोला ( आवृत्ती प्रमुख ) , लोकसत्ता - पुणे ( सहाय्यक संपादक ), पुढारी - पुणे ( कार्यकारी संपादक ) , कृषीवल - अलिबाग ( संपादक ) सकाळ - मुंबई ( संपादक ), साम - मुंबई ( संपादक ) असा प्रवास करून संजय आवटे औरंगाबादमध्ये दिव्य मराठी मध्ये चार वर्षांपूर्वी राज्य संपादक म्हणून जॉईन झाले होते.
एक डाव्या विचारसरणीचे विचारवंत म्हणून संजय आवटे यांची ओळख आहे. बराक ओबामा, नियतीशी करार, गेम ऑफ थ्रोन्स ,आम्ही भारताचे लोक आदी आवटे यांची पुस्तके प्रकाशित आहेत.
लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित सेवानिवृत्त झाल्यानंतर काही महिन्यापूर्वी संपादक पाहिजे अशी जाहिरात लोकमतने दिली होती. या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते, मात्र योग्य उमेदवार न मिळाल्याने संजय आवटे यांना अखेर ऑफर देण्यात आली.
आवटे यांच्याबद्दल दोन मतप्रवाह असले तरी एक अभ्यासू विचारवंत , हुशार संपादक आणि चांगला लेखक अशी आवटे यांची प्रतिमा आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विषयाचा सखोल अभ्यास , सर्व पक्षाच्या नेत्याशी थेट संबंध, पुरोगामी विचारवंत, साहित्य क्षेत्रात वावर, न्यूज सेन्स असलेला पत्रकार, प्रयोगशील संपादक अशी त्यांची ओळख असून याच आवटे यांच्या जमेच्या बाजू आहेत.
राजा माने तरुण भारत मध्ये जॉईन
लोकमतमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर राजा माने गेले एक वर्षे रिकामे होते. अखेर त्यांनी सोलापूर तरुण भारतमध्ये मुख्य संपादक म्हणून काही दिवसापूर्वी जॉईन झाले आहेत. सोलापूर तरुण भारतची ओळख संघ विचारसरणीचा आणि भाजपचे मुखपत्र अशी आहे. माने तरुण भारत मध्ये जॉईन झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोलापूर तरुण भारत देखील आता काळाच्या प्रवाहात कमर्शियल झाला, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
राजा माने यांची पत्रकारिता लोकमत पासून सुरु झाली होती. लोकपत्र, एकमत, सुराज्य, पुढारी, पुन्हा लोकमत असा करून ते एक वर्षांपूर्वी लोकमत मधून सेवानिवृत्त झाले होते.
'माने या न माने ' पण राजा माने तरुण भारतचे संपादक झाले , हे ऐकून तरुण भारत वाचक म्हणत आहेत..यह बात कुछ हजम नहीं हुई ...
0 टिप्पण्या