मोहोळच्या खंडणीखोर पत्रकारावर गुन्हा दाखल


सोलापूर : मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गाच्या काम करणाऱ्या ठेकेदाराला गेल्या चार महिन्यापासून मी दैनिक माणदेश नगरी या वृत्तपत्राचा पत्रकार असून माझ्याकडे लक्ष द्या, तुमच्या बातम्या छापणार नाही, मला पैसे द्या, अन्यथा तुम्हाला अडचणीत आणून तुमचे काम बंद पाडीन, तुम्हाला आयुष्यातून उठवीन, अशी वारंवार धमकी देऊन फोन पे व रोख स्वरूपामध्ये ३५ हजार रुपयाची खंडणी घेऊन धमकी दिल्याप्रकरणी पेनूर (ता. मोहोळ) येथील नेताजी तानाजी शिंदे या पत्रकाराच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दि.७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ-पंढरपूर-आळंदी या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम सुरू असून या महामार्गावरती मोडनिंब येथील प्रशांत उर्फ दिनेश हनुमंत गिड्डे हे ठेकेदार म्हणून काम करतात. त्यांना गेल्या चार महिन्यापासून पेनूर (ता. मोहोळ) येथील दैनिक माणदेश नगरी चा पत्रकार नेताजी तानाजी शिंदे हा वारंवार तुम्ही ठेकेदार आहात, तुमची कामे कुठे व कशी चालू आहेत याबाबतची मला चांगली माहिती आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला अडचणीत आणून वरिष्ठांकडे तक्रार करून काम बंद पाडीन, अशी सातत्याने धमकी देण्याचे काम चालू होते, यामुळे गेल्या चार महिन्यापासून सातत्याने मानसिक त्रासाला कंटाळलेल्या प्रशांत गिड्डे यांनी प्रारंभी दि.२६ फेब्रुवारी रोजी फोन पे वरून ५ हजार पाठवले. तर दि.२ मार्च रोजी पुन्हा फोन आल्याने पेनूर येथे जाऊन राजकुमार माने यांच्या हस्ते रोख ५ हजार दिले. त्यावेळी शिंदे यांनी माझी एवढी कमी किंमत नाही, हे तुम्ही बरोबर करीत नाही, अशी धमकी देऊन निघून गेला होता. 


त्यानंतर दि.१६ मार्च पासून पुन्हा शिंदे हा सातत्याने प्रशांत गिड्डे यांना मोबाईल द्वारे फोन करून व मेसेज द्वारे माझा मोबाईल खराब झाला आहे. मला नवीन मोबाईल घेऊन द्या, अशी सातत्याने मागणी करू लागला. यावेळी गिड्डे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या जवळ असणाऱ्या एका मोबाईल शॉपी मध्ये शिंदे ला पाठवून दुकानदाराला १० ते १५ हजार रुपयांचा मोबाईल घेण्यासाठी पाठवले होते. तेथे दुकानात गेल्यावर शिंदे यांनी मला ३५ हजार रुपयेचा मोबाईल पाहिजे, अशी मागणी करून निघून आला. त्यानंतर दि.२६ मार्च पासून फोन करून तुमचे १५ हजार रुपये व माझे ३५ हजार रुपये राहू द्या, मला २५ हजार रुपये द्या, आपण हा विषय संपवून टाकू, असा फोन केला. त्यावेळी गिड्डे यांनी माझा कामाचे बिल निघाल्यानंतर मी तुम्हाला हे पैसे देतो असे सांगितले होते. त्यानंतर शिंदे यांनी वारंवार फोन करून पैशाची सातत्याने मागणी केल्याने अखेर वैतागलेल्या ठेकेदार प्रशांत गिड्डे यांनी दि.७ एप्रिल रोजी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना शिंदे याने आजपर्यंत फोनद्वारे दिलेल्या त्रासाची माहिती सांगितली. 


यानुसार दि.७ एप्रिल रोजी रात्री ९ : ३० वाजताच्या दरम्यान मोहोळ येथील हॉटेल लोकसेवा येथे पैसे देण्याचे ठरले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा लावला. यावेळी २५ हजार रुपये रोख रक्कम हातात स्वीकारताना नेताजी शिंदे याला पोलिस पकडण्यासाठी धावले असता शिंदे याने हातातील पैसे टेबलाच्या खाली टाकून त्या ठिकाणाहून निघून जावू लागला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सदरची रक्कम जप्त करून प्रशांत गिड्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३५ हजार रुपयांची खंडणी घेऊन धमकी दिल्याप्रकरणी नेताजी शिंदे यांच्यावर भा. द.वि. ३८७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर खारगे हे करीत आहेत.Post a Comment

0 Comments