माध्यमं आणि पत्रकारिता...

 लोकशाहीचा चौथा स्तंभ... दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून ते आजच्या वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि विविध वेबसाईट्समधील पत्रकारिता. साधा एक मिनिटभर विचार केला तर मनात काहूर माजतं. विश्वविख्यात माध्यमतज्ञ ए. ए. बेर्जर यांनी म्हटलंय की, वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते. मात्र, कुठली माध्यमं सामाजिक संकेत / संदेश देतात? कोणती कार्यात्मक भूमिका घेतात? कोणती मूल्ये पाळली जातात? हा संशोधनाचा विषय ठरेल. पत्रकारितेचा विद्यार्थी आणि माध्यमांमधील कर्मचारी (स्वत:ला पत्रकार म्हणावं की नाही या शंकेतून कर्मचारी) म्हणून घेतलेला सहा - सात वर्षाचा अनुभव फार काही चांगला म्हणावा असा नाही. 


इंग्रज राजवटीत समाजाच्या प्रबोधनाची गरज होती. लोकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणिव करुन देण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एका माध्यमाची गरज होती आणि ते माध्यम म्हणजे वृत्तपत्र. तत्कालीन वृत्तपत्र आणि पत्रकार, लोकप्रतिनिधींनी या माध्यमाचा वापर करत आपले ईप्सित साध्य केले. काळ बदलला, माणूस बदलला... चळवळीत सामाजिक आणि राजकीय भान निर्माण करण्यापासून, सामाजिक बदलांसाठी ध्येयवेडी पत्रकारिता ते आताची हाती मोबाईल आणि बुम घेऊन दिसेल त्या वाटेने पळत सुटणारी 24 बाय 7 पत्रकारिता, जमीन आसमानाचा फरक आहे. 


शाळेत असताना वाचनालयात जाऊन पेपर वाचणे, टीव्हीवर बातम्या पाहणे सुरु असायचं. तेव्हाही पत्रकारिता शांत आणि परिणामकारक भासायची. पेपरमध्ये मन लागेल असं वाचायला मिळायचं. साप्ताहिक आवर्जुन वाचावी वाटायची. टीव्हीवरही फार आरडाओरड नसायची. ग्रामपंचायतच्या टीव्हीवर संध्याकाळी सातच्या बातम्या पाहण्यासाठी जमलेली गर्दी तेवढ्या अर्धा-एक तासात जगभरातील घडामोडींचं ज्ञान घेऊन घरी परतायची. दुसऱ्या दिवशी पारावर म्हाताऱ्यांचीही राज्य आणि देशाच्या राजकारणावर चर्चा असायची. 


फार काळ लोटला आहे अशातला भाग नाही. कदाचित 10 - 12 वर्षांपूर्वीपर्यंत पत्रकारिता या शब्दाचा अर्थ नेमका आणि सुस्पष्ट होता. वृत्तपत्रे राज्यातील विषयांना उचलून धरायची. टीव्ही चॅनेल्सचे पत्रकार राजकीय मंडळींवर प्रश्नांची सरबत्ती करायची. कितीही मोठा आणि हुशार पुढारी असला तरी पत्रकारांपासून काहीसं अंतर बाळगून असायचा. राज्याच्या राजकारणाची दिशा माध्यमं ठरवायची. एखादा विषय माध्यमांनी उचलून धरला की पुढाऱ्यांना त्या विषयावर तोडगा काढण्याशिवाय पर्याय उरायचा नाही. पत्रकार परिषदेत नेते मंडळींची भंबेरी उडाल्याचं मी टीव्हीवर अनेकदा पाहिलं आहे. नेतेमंडळी पत्रकारांना दबकून असायची. हाती घेतलेला विषय तडीस गेल्याशिवाय पत्रकारही शांत बसायचे नाहीत. वृत्तपत्रांमध्ये तर एखाद्या विषयाची मालिका चालायची. राजकारण बदलायची ताकद तेव्हा माध्यमांमध्ये होती. 


आज चित्र बदललं आहे. पत्रकारिता धावतेय, पत्रकार धावत सुटलेत. कुठे आणि कशाचा मागे ते कळायला मार्ग नाही. हाती बुम घेऊन पळत सुटलेल्या पत्रकारांना कार्यालयातून प्रश्न दिले जात आहेत. कदाचित त्या पत्रकाराला स्वत:वर विश्वास नसेल किंवा कार्यालयातरी त्यांच्यावर. तुम्हाला काय वाटतं? या पलीकडे दुसरा आणि टोकदार प्रश्न विचारण्याचं धाडस सहसा कुणी करताना दिसत नाही. 24 तास धावण्याच्या नादात अभ्यास करायलाच आम्ही विसरलो असू तर मग दुसरी अपेक्षा तरी काय करणार. किंवा आम्हीच नेतेमंडळी, पुढाऱ्यांच्या दावणीला बांधलो गेलो असू तर मग विषय न काढलेलाच बरा. त्यातच टीआरपीच्या स्पर्धेमुळे पत्रकारितेची माती होतेय. भडक, रंगतदार दाखवण्याच्या नादात आमचं सामाजिक भान हरपलं गेलंय.


शेतकरी आत्महत्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचार, शेतीवरील संकट, समाजातील एखाद्या खालच्या स्तरातील मुला-मुलीने गाठलेली उंची, सामाजिक भान जपत एखाद्याने केलेली कौतुकास पात्र कृती आजच्या पत्रकारितेत शोधावी लागतेय किंबहुना शोधूनही सापडत नाही. एखादवेळी दाखवलं जातं, पण तेव्हा आकडा मोठा असावा लागतो. दिसणारं चित्र ठळक आणि नजरेत सामावणारं नसावं लागतं!


मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार सगळं चाललं आहे. पण मागणी नेमकी कोण करतंय? कोड्यात पडायचं काहीच कारण नाही. ही मागणीही तुम्ही आम्हीच करतो आहोत. तुम्हाला आम्हालाच आज सामाजिक विषय नको आहेत. शेतकरी आत्महत्येच्या बातम्या नको असतात. एखादी सक्सेस स्टोरी नको असते. हवं असतं ते वर सांगितल्या प्रमाणे भडक, ठळक आणि नजरेतही न सामावणारं. आज टीव्ही, मोबाईलवर आपण स्वत: काय पाहतो, काय वाचतो, कोणता फोटो बघून बातमीवर थांबतो किंवा क्लिक करतो? वर्तमानपत्रात तरी आपण कोणत्या बातम्या वाचतो? जरा स्वत:लाच विचारा आणि प्रामाणिकपणे विचार करा. 


पत्रकार ध्येयवेडे राहिलेले नाहीत. नव्या अनेकांना स्क्रिनवर दिसणं ही पत्रकारिता भासते. आपला आवाका वाढवावा, विषय समजून घ्यावेत, सामाजिक, राजकीय भान लक्षात घ्यावं, बातमीचे अंग तपासावेत असं आज क्वचितच कुणाला वाटतं. या सगळ्याला जबाबदार कोण? काळाप्रमाणे नक्कीच बदलावं पण किती आणि कोणत्या प्रकारे? हा विचार तुम्ही आम्ही नक्कीच केला पाहिजे. नाही तर आज उरली सुरली पत्रकारिता कधी 24 बाय 7 दुकानदारी होईल आणि तुम्ही आम्ही गल्लावर बसलेल्या दुकानदाराप्रमाणे भासू सांगता येत नाही. 

-  सागर जोशी, मुंबई 


( हे वैयक्तिक मत आहे. मनात अनेक दिवस घोळत होतं ते लिहिलं आहे. स्वत: पत्रकार म्हणून आणि पत्रकार, माध्यमांना शिव्या घालणाऱ्यांसाठी लिहावं असं वाटलं म्हणून... अनेकांना आक्षेप असू शकतो, तो त्यांनी जरूर नोंदवावा.)

Post a Comment

0 Comments