जाधव,बातमी पाठवा की लवकर किती वेळ थांबायचं ?



गौतम बुद्धांना एकदा एका प्रश्नकर्त्याने विचारले 'इच्छाशक्ती आणि मनोबलाने अशक्य ते शक्य आहे असे म्हणता,मग चाळणीतून पाणी नेता येईल का ?' प्रश्न खवचट होता.पण बुद्धांनी शांतपणे सांगितले 'होय,शक्य आहे.पण त्यासाठी तुम्ही पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम बाळगला पाहिजे.'आमचे सन्मित्र नागनाथ जाधव त्याही पलीकडचे होते.त्यांच्यात उकळत्या पाण्याचा बर्फ करण्याची क्षमता होती.मला नाही वाटत आयुष्यात त्यांचे कोणाशी कधी वाद-विवाद,भांडण-तंटे झाले असतील म्हणून.ते कोणावर किंवा कोणी त्यांच्यावर चिडले-रागावले असेल म्हणून.त्यांच्या मुखातून समोर किंवा मागे कोणाबद्दल अपशब्द बाहेर पडला असेल म्हणून.त्यांना कोणी शत्रू असेल म्हणून.असे अत्यंत निरागस,निर्लेप मनाचे,दैनिक लोकपत्रचे बीड जिल्हा प्रतिनिधी आणि आमचे मित्र भवदिय नागनाथ जाधव यांचे काल अचानक हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.


अवघ्या पन्नाशीत शंभर वर्षांचे आयुष्य जगून हा माणूस ध्यानीमनी नसताना, न सांगता न कळवता,चाहूलही लागु न देता निजधामाला निघून गेला.एरवी साधं सर्दी पडसं झालं,पावसात भिजला,टाचणी टोचली तरी फोन करुन,एस.टी.
बसचे धक्के खात बीडहून औरंगाबादला टल्लेखात येऊन  सगळं काही इत्यंभूत बैजवार सांगणारा.मन मोकळं करणारा हा माणूस.आज असा काहीच कळू न देता गेलाच कसा? कार्यकारी संपादक पदाच्या अधिकाराने आणि एक सन्मित्र म्हणून त्याला याचा जाब विचारायचा म्हटले तर तो नॉट रिचेबल आहे.अरे देवा तुला शोधू कुठं ? तर त्याचे लोकेशन थेट स्वर्गात ! जाधव, हे बरे नाही केलेत.अजून कितीतरी जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या तुम्हाला.गेली ३०-३२वर्षे तुम्ही लोकपत्र परिवाराचे अविभाज्य घटक होतात .बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून दैनिक लोकपत्रसाठीचे तुमचे योगदान, तुमचे स्थान आणि तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.


तुमचा मित्रपरिवार मोठा होता.तुम्ही ज्यांना भेटत असत.संपर्कात येत असत. त्यांच्याशी तुमचे कायमचे अतूट जिव्हाळ्याचे नाते निर्माण होत असे.तुमच्या बाजूने हे नाते तुम्ही किती निरपेक्षपणे निभावत असत हे मी स्वत: अनुभवलेले, पाहीलेले आहे. दैनिक लोकपत्रचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमच्या कर्तव्य आणि जबाबदारी बाबतीत  शत प्रतिशत प्रमाण होताच,परंतु त्याहीपेक्षा मला भावला तो तुमचा साधेपणा,संयत संतुलित विनम्र स्वभाव,कमालीचा संयम आणि पराकोटीची सहनशीलता,निस्वार्थी सहकार्यता,आणि प्रौढत्वी निजशैव असा  मनाचा कोमल हळवेपणा. तुम्ही मूर्तिमंत शांतीब्रम्ह होतात.गर्व, अभिमान,अहंकार,मी पणा,स्वार्थ हे शब्द तुमच्या पासून करोडो मैल दूर राहीले.


तुमच्या आवाजाची पट्टी कधीच चढलेली ऐकली नाही,कधी कानावरही आली नाही.तुमच्या वाट्याला सगळा आनंदी-आनंद होता असे नाही,परंतु जगरहाटीच्या कटु अनुभवांचा गढूळ गाळ तुम्ही कधीच मनाच्या पृष्ठभागावर आणला नाहीत. तुमच्या चेहऱ्यावरील विरक्तीचा भाव कधीच बदललेला दिसला नाही.हेच तुमचे संचीत आम्हाला हुरहूर लावते आहे. तुम्ही स्वर्गस्थ झालात.तुमच्या निर्मळ आत्म्याला चीरशांती लाभली.दैनिक लोकपत्र परिवार,दैनिक लोकपत्रचे संपादक श्री अंकुशराव कदम,श्री कमलकिशोर कदम आणि वैयक्तिक माझी आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.तुमच्या नसण्याचे डोंगराएवढे दुःख पचवण्याची शक्ती आपल्या परिवाराला लाभो,ही सदिच्छा ! पण, अजूनही वाटते तुमचा फोन येईल,आणि नेहमीच्या अतिशय हळुवार मृदू मुलायम आवाजात तुम्ही म्हणाल 'सर स्वारी,जरा उशीर झालाय...पण बातमी पाठवू का ? महत्वाची आहे...जरा तुमच्या पद्धतीने हाय लाईट करा'.जाधव,बातमी पाठवा की लवकर किती वेळ थांबायचं ?


- रवींद्र तहकिक 

७८८८०३०४७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या