'पत्रा'कार संजय 'उवा' च !


हा मुद्रा राक्षसाचा विनोद नाही.म्हणजे प्रिंट मिस्टेक वगैरे.खरेच 'पत्र'कार संजय राऊत 'पत्रा'कार ठरलेत.ते दोषी आहेत की निरपराध हे नियती ठरवेल.कारण हे आता न्यायालयात ठरेलच याची खात्री वाटत नाही.आपल्याला त्या राजकीय कुलंगड्यात पडायचे नाही.खरे तर आपण पत्रकारांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बेरक्या'च्या प्लॅटफॉर्मवर देखील या विषयावर व्यक्त होणे औचित्याचे ठरेल काय ? याबाबत मी साशंकच आहे.कारण तसेही संजय राऊत आताशा पत्रकार म्हणून राहिलेच कुठे होते ? उगीच आपले बुडाखाली सामनाचे कार्यकारी संपादक पद आहे,संपादकीय पानावर अग्रलेखाच्या नावाखाली रोज भाजप आणि मोदी-शहांच्या नावाने ठणाणा करीत असतात आणि रविवारी रोखठोकच्या नावाने कोणच्या तरी विषयावर कोणालातरी शिव्यांची लाखोली वाहतात,एवढेच ! 


बाकी पत्रकार म्हणून त्यांनी कधी संसदेत पत्रकारांच्या प्रश्नावर काही आवाज उठवला आहे.केंद्रात राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार असताना पत्रकारांच्यासाठी म्हणून कधी काही कर्तव्य बजावले आहे ; असे आमच्या तरी ऐकिवात नाही.त्यामुळे आज त्यांच्यावर जो प्रसंग गुदरला आहे त्या बद्दल पत्रकार म्हणून काही सहानुभूती व्यक्त करावी,निषेध नोंदवावा असे मनापासून वाटत नाही.माझ्या या मताशी आपण असहमत असू शकता.परंतु तसेही त्यांच्या अंगलट आलेले हे प्रकरण त्यांच्या पत्रकारितेशी संबंधित नाही.त्यांच्या एखाद्या लेख अथवा अग्रलेखावर काही कारवाई झाली असती तर गोष्ट वेगळी होती.संजय राऊतांना पत्रकार म्हणायचे,खासदार म्हणायचे,राजकारणी म्हणायचे की पक्ष प्रवक्ते हाही प्रश्न आहेच.


त्यांनी शिवसेना-भाजप युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी सरकार आणण्यात आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात मोठी भूमिका बजावली हे खरे.गेले अडीच वर्षे शिवसेना पक्षात त्यांचीच चलती होती,हेही तितकेच खरे.परंतु ते कदापिही प्रति बाळासाहेब होऊ शकत नाहीत.पत्रकार म्हणूनही नाही आणि राजकारणी म्हणूनही नाही.पण राऊत बहकत गेले.पत्रकारिता करता करता ते चक्क 'पत्री' सरकार चालवण्याचा थाटमाट करू लागले. हा 'पत्रा'कार पणा त्याचाच परिणाम आहे.आधीच म्हटल्या प्रमाणे या प्रकरणाकडे राजकारण म्हणून पाहण्याची आणि त्यावर भाष्य करण्याची ही जागा नाही.इथे संजय राऊत यांना फक्त पत्रकार म्हणून पाहणे आणि त्याच अनुषंगाने या घटनेची समीक्षा करणे योग्य ठरेल.


संजय राऊत यांनी या प्रकरणात गैरव्यवहार केला आहे.हे स्पष्ट आहे.प्रश्न फक्त इतकाच आहे की त्यांच्यावरच कारवाई का म्हणून ? बाकी सगळे धुतले तांदूळ आहेत का ? तर नाहीत ! पण इतर दोषींवर कारवाई होत नाही मग माझ्यावरच का म्हणून ? हा काही निर्दोष ठरण्याचा पुरावा ठरत नाही.त्याने गुन्ह्याची तीव्रताही कमी होत नाही.एक गम्मत सांगतो : पत्राचाळ प्रकरणातले गैरव्यवहारातले आकडे समोर आल्यावर एका जेष्ठ पत्रकाराने खासगीत असे म्हटले की 'काही म्हणा संजयने कमावलं बरंका...नाव,पैसा,खासदारकी,सबकुछ ! म्हणजे बहुतेक पत्रकारांना संजय राऊतांनी केलेल्या गैरव्यवहाराचे कौतुकच आहे.

अनेकजण तर 'सुटेल हो, पाच-सहा महिन्यात,किंवा फार फार तर दोन-अडीच वर्षात ! मग पचतंय सगळं.भुजबळांचं नाही का पचलं...च्यायला म्हणजे ही मानसिकता बनलीय आता.तरीच,म्हणतो गावखेड्यापासून मुंबई-दिल्लीपर्यंत पत्रकारितेत पॅकेज-पाकीट संस्कृती का वाढलीय.हेच हेच 'उवा' च ! संजय 'उवा'च !


-रवींद्र तहकिक

७८८८०३०४७२


Post a Comment

0 Comments