उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा गैरवापर केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत उघडकीस आले होते, त्यानंतर पत्रकार संघाचा सांजा रोडवरील वीस गुंठे भूखंड शासनखाती जमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडे मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघास दोन वेळा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर रक्कमेचे सनदी लेखापालाचे विनियोग प्रमाणपत्र देण्याचा आदेश देऊनही पत्रकार संघाने हे प्रमाणपत्र न दिल्याने सांजा रोडवरील वीस गुंठे भूखंड शासनखाती जमा होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ इमारत असून , ही इमारत छोटी असल्याचे कारण सांगत तत्कालीन पदाधिकाऱ्यानी इमारतीचे वाढीव बांधकाम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे दहा लाख रुपये निधी मागितला होता. जोशी हे भूकंपग्रस्त सास्तूर भागाच्या दौऱ्यासाठी आले असता, त्यांनी १० लाख निधी मंजूर करून दोन लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीतून १८ जानेवारी १९९६ रोजी पत्रकार संघास अदा केला होता,
मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेले दोन लाख रुपये इमारतीच्या वाढीव बांधकामासाठी न वापरता सांजा रोडवर सर्वे नंबर २४९ व २५० मधील वीस गुंठे भूखंड विकत घेतला व मुख्यमंत्री निधीचा गैरवापर केला होता, त्यानंतर पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दैनिक संघर्ष या स्थानिक वृत्तपत्रात या भूखंड विक्रीची दोनदा जाहिरात देऊन हा भूखंड विक्री करून मलिदा लाटण्याचा प्रयत्न केला होता, त्याची लेखी तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय चौकशी समिती गठीत केली असता चौकशीत निधीचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले होते. .
त्यानंतर पत्रकार संघाचा सांजा रोडवरील वीस गुंठे भूखंड शासनखाती जमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडे मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघास दोन वेळा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर रक्कमेचे सनदी लेखापालाचे विनियोग प्रमाणपत्र देण्याचा आदेश देऊनही पत्रकार संघाने हे प्रमाणपत्र न दिल्याने सांजा रोडवरील वीस गुंठे भूखंड शासनखाती जमा होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ नोंदणीकृत नसून मराठी पत्रकार परिषदेची संलग्न आहे, मात्र या संघाने गेले अनेक वर्ष मराठी पत्रकार परिषदेची कसलाही संबंध ठेवलेला नाही तसेच दोन पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील इमारतीचा काही पत्रकारांनी फुकट वापर केलेला आहे. ऑडिट रिपोर्ट अनेक वर्षे सादर नाही. वार्षिक सभा नाही, निधीचा गैरवापर सुरु आहे.
आकाशवाणीसमोरील सहा गुंठे भूखंड शासनखाती जमा झाल्यानंतर आता सांजा रोडवरील २० गुंठे भूखंडही शासनखाती जमा होण्याच्या मार्गावर आहे. तसेच आंबेडकर पुतळ्याजवळील इमारतीचे पीआर कार्ड देखील रद्द झाले असून, ही इमारत पत्रकार संघाच्या मालकीची राहिलेली नाही. सर्व मालमत्ता शासनखाती जमा होऊनही दोन निगरगट्ट पदाधिकारी आपल्या पदाला चिटकून आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा देण्याची मागणी होत आहे.
0 टिप्पण्या