या खूनाला वाचा फुटेल ?रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या तालुक्याच्या गावात एका पेट्रोल पंपासमोरच्या रस्त्यावर जवळपास शंभराहून अधिक लोकांच्या डोळ्यासमोर एक थार गाडी सुसाट वेगात येते आणि एका स्कुटीला धडक देऊन तितक्याच सुसाट वेगाने निघून जाते.एखाद्या टिपिकल साऊथ इंडियन मारधाडपटात शोभून दिसावा असाच हा काळजाचा ठोका चुकवणारा थरारक प्रसंग.लोक बघत रहातात.या घटनेत एका व्यक्तिचा जागीच जीव जातो.मरणारी व्यक्ती एक पत्रकार असते आणि धडक मारणारा एक नामचीन गुंड,राजकीय कार्यकर्ता,जमीन व्यवहार करणारा दलाल,व्यापारी,खासगी सावकार,प्रॉपर्टी डीलर,व्यावसायिक ईत्यादी वगैरे.थोडक्यात बडी आसामी.मरणारा पत्रकार शशिकांत वारीशे,तर मारणारा गुंड पंढरीनाथ आंबेरकर.हा जो काही पंढरीनाथ आंबेरकर आहे,त्याची ओळख वरील परिच्छेदात दिली आहे.असे राजकीय वरदहस्त असलेले बाहुबली पूर्वी बिहार-उत्तरप्रदेशात दिसायचे आता महाराष्ट्राच्या गावोगावी आढळू लागले आहेत.


त्यांना कशाचाही विधिनिषेध नसतो.कायद्याची भीती नसते.स्थानिक पोलीस त्यांच्या खिशात असतात.गावात त्यांची वट म्हणण्यापेक्षा दहशत असते,आणि प्रशासनात धाक.आजकाल सगळ्याच राजकीय पक्ष आणि नेत्यांना,स्थानिक आमदार-खासदार-मंत्र्यांना अशा हॅन्डची गरज असते.गरजेनुसार खास कामासाठी अशा गुंडांचा वापर केला जातो.त्या बदल्यात राजकीय पक्ष आणि नेते या गुंडांना सर्व प्रकारचे अभय देतात.पैसेही पुरवतात.थोडक्यात पोसतात.यांचे धंदे सगळे अवैधच असतात.उदाहरणार्थ वाळू आणि गौण खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन,चोरी,वाहतूक,विक्री.सरकारी जागांवर अतिक्रमण,प्लॉट बळकावणे,हप्ते आणि खंडण्या वसूल करणे,जमिनीचे व्यवहार-त्यात दलाली.सरकारी कामांची ठेकेदारी,बोगस दारूची निर्मिती आणि विक्री,गुटखा,गांजा पासून ड्रग्जचा व्यापार,साठा आणि वितरण-व्यवहार,गुत्ते-क्लब-ढाबे-कुंटणखाने असे नाही नाही ते प्रकार.हे सगळे बिबोभाट चालते.बोभाटा झाला तर प्रकरण दाबले दडपले जाते.त्यासाठी धमक्या,मारहाण,पोलिसांचा ससेमिरा,राजकीय नेत्याकडून समज,खोट्या गुन्ह्यात अडकवणे,या पासून सरळ 'ढगात पोहचण्यापर्यंत' सगळे हाथकंडे सढळ हाताने आणि बिनधास्त वापरले जातात.अशा स्थितीत एखाद्याचा आवाज बंद करण्यासाठी पोलिसाकरवी त्याला 'उचलला' आणि कोर्टा मार्फत 'अंदर' केला तर त्याची दाद-दखल कोण घेणार ? एखाद्याला गायब केले जाते.एखाद्याचे हातपाय तोडले जातात,एखाद्याला भोसकून किंवा गोळ्या घालून ठार केले जाते,किंवा मग अपघाताचा बनाव करून 'गेम' केला जातो.राजापूर मध्ये घडलेली घटना हे हिमनगाचे वरचे टोक आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणात आता गुंडाराज इतके फोफावले आहे की त्याला कंट्रोल करणे शक्यतेच्या पलीकडे पोहचले आहे.मुळात कंट्रोल करणार कोण ? पोलीस ! ते सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले आणि गुंडांच्या हातचे खेळणे होऊन बसले आहेत.राजकारण्यांचे आणि त्यांच्या बाहुबली गुंडांचे अनेक अवैध धंदे,राडे आणि गेम पोलिसांच्याच देखरेखीत घडतात ही वस्तुस्थिती आहे.मग यांना अडवणार-रोखणार कोण ? सरकार ! म्हणजे शेवटी कोणीतरी राजकीय पक्ष आणि त्या पक्षाचे नेतेच ना.तेच तर या सगळ्याचे प्रतिपालक आहेत.कोणतेही सरकार असो,की कोणताही राजकीय पक्ष.किंवा त्या पक्षाचा स्थानिक,प्रादेशिक,राष्ट्रीय नेता,आमदार-खासदार अथवा मंत्री.सगळ्यांच्या पदरी या अशा गुंडाचा सुकाळ असतो.ज्याची सत्ता त्याची चलती.म्हणूनच तर सरकारी सुरक्षा असूनही लोकप्रिय लोकनेत्यांना सुद्धा खासगी बाउन्सर घेऊन फिरावे लागते.तरीही त्यांच्या सुरक्षेची गॅरंटी नाही.अशा स्थितीत २०-२५ हजार पगार असणारा,स्कुटीवर फिरणारा एक पत्रकार गाडीखाली चिरडून मरत असेल तर त्याच्या खुनाला वाचा फुटेल कशी ? या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी होईल,कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,वगैरे म्हटले जात आहे खरे,पण त्यात ना करुणेचे आसू आहेत,ना तळमळीची माया. 


-रवींद्र तहकिक 

कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र 

औरंगाबाद,7888030472

Post a Comment

0 Comments