खंडणीबहाद्दर पत्रकारांना बसला 'जोर का झटका'

नाशिक रोडच्या व्यापाऱ्याला लुटायचे कारस्थान अखेर फसले ... 


 नाशिक : बांधकामाचे स्टील चोरी करणाऱ्या भंगार व्यावसायिकाकडून खंडणी उकळणे एका राज्यस्तरीय वाहिनीचा कॅमेरामन, स्थानिक वाहिनीचा कॅमेरामन आणि राज्यस्तरीय दैनिकाचा प्रतिनिधी यांच्यासह एका पक्षाच्या नेत्याला चांगलेच महागात पडले. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभर चर्चेत असलेल्या जिल्ह्यातील एका आमदाराच्या मध्यस्थीने या खंडणी प्रकरणावर पडदा पडला असला, तरी संपूर्ण जिल्ह्यात हे प्रकरण सध्या चवीने चघळले जात आहे. दरम्यान, या खंडणीबहाद्दरांची सुटका होण्यापूर्वी त्यांना पोलिसांनी यथेच्छ चोप दिल्याचे समजते.


चकचकीत चारचाकी, आलिशान बंगला व खर्च करायला भरपूर पैसे, असे मध्यमवर्गीयांचे स्वप्न असते. 'ग्लॅमर'च्या दुनियेत वावरणाऱ्या काही पत्रकारांना अलीकडे या ऐषोरामाची जणू भुरळच पडू लागली आहे. त्यामुळेच घसघशीत वेतन असतानाही गैरमार्गाने पैसे मिळविण्याकडे अशा काही पत्रकारांचा कल वाढल्याचे दिसते. कालपरवापर्यंत सॉफ्ट टार्गेट असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'ठोकून' पाहिजे तशी 'वसुली ' करणाऱ्या अशा काही पत्रकारांची मजल थेट खंडणी उकळण्याकडे गेल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. 


शिंदे गावापुढे असलेल्या एका भंगार व्यावसायिकाला 'सावज' बनविण्याच्या 'प्लॅन' आदल्या दिवशी ठरला. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने काही ना काही कारण सांगून कार्यालयातून रीतसर परवानगी घेतली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे हे सगळे घटनास्थळी पोहोचले. यात एका राज्यस्तरीय वाहिनीचा कॅमेरामन, स्थानिक वाहिनीचा कॅमेरामन, एका राज्यस्तरीय दैनिकाचा प्रतिनिधी व एका पक्षाच्या नेत्याचा समावेश होता. एका ठिकाणी उपस्थित असलेल्या भंगार व्यावसायिकाला दरडावत दहा लाखांची मागणी करण्यात आली. व्यावसायिकाने पाच लाख देण्याचे कबूलही केले, पण व्यावसायिक घाबरल्याचे हेरून या पत्रकारांचे मनोबल आणखीच वाढले. दहा लाखांवर ते अडून बसले. दहा लाख रुपये देत नाही तोपर्यंत व्यावसायिकाला बंदी बनविण्यात आले. संयम सुटलेल्या व्यावसायिकाने थेट पोलिसांना फोन केला. आधी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस आले, पण हद्दीचा प्रश्न निर्माण झाल्याने नाशिक रोड पोलिसांना घटनेबद्दल कळविण्यात आले. काही क्षणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले अन् खंडणीबहाद्दरांना घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या साऱ्या प्रवासात खंडणीबहाद्दरांना पोलिसानी यथेच्छ चोप दिल्याची माहिती आहे.


 या प्रकरणातील संबंधित नेत्याने आपण एका बलाढ्य पक्षाचा नेता असल्याची बतावणी करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर खंडणीबहाद्दरांनीही 'आम्ही कोण आहोत' हे सांगण्याचा प्रयत्न करून आपली मान सोडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, एका चर्चेतील आमदाराच्या मध्यस्थीने ही कारवाई टळली. केवळ समज देऊन खंडणीबहाद्दरांना सोडून देण्यात आले. या घटनेला चार दिवस लोटले असले, तरी ते खंडणीबहाद्दर नेमके कोण? याची चर्चा जिल्हाभर चवीने चघळली जात आहे. 'शिकारी खुद यहाँ शिकार हो गये' असेच माध्यमविश्वात बोलले जात आहे. 


पत्रकारितेची लक्तरे वेशीवर राजकारणी वा अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'ठोकून' त्यांच्या चुका वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवल्या जातात. स्वतःला देव, न्यायाधीश वगैरे समजणारे स्वतःच खंडणी उकळून स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून घेत असतील आणि वरिष्ठांकडून त्यांना पाठबळ मिळत असेल, तर याची दखल नेमकी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या खंडणीबहाद्दरांना विशिष्ट खोलीत नेण्याआधी जोडे बाहेर काढून ठेवायला सांगितल्याने अवघ्या पत्रकारिता क्षेत्राची लक्तरेच वेशीवर टांगली गेली. खंडणीबहाद्दरांनी शहरात यापूर्वी अशाच पद्धतीने खंडणी वसूल केल्याचे बोलले जाते.                     Post a Comment

0 Comments