बुलढाण्यात घाटावर अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करण्याचा पत्रकाराचा 'प्रताप' !

- संघटनेच्या नावाखाली टोळीने आणला अधिकार्‍यांच्या नाकात दम !बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्यातील घाटावर असलेल्या तालुक्यांसाठी 'ग्रामीण' पत्रकारांची संघटना म्हणून सांगणार्‍या एका अवैध संघटनेने अधिकारी, कर्मचारी यांना ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा सुरू केला आहे. या संघटनेच्या घाटावरील अध्यक्षाने एका अंगणवाडी सेविकेकडून बातमी न छापण्यासाठी सात हजार रूपये घेतल्याचा 'प्रताप' केला असल्याने चांगल्या पत्रकारांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. 


घाटावरील चिखली, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांत संघटनेच्या नावाखाली काही पत्रकारांनी धुमाकूळ घातला असून, यातील बहुतांश पत्रकार हे किरकोळ स्थानिक पोर्टल किंवा पीडीएफ दैनिकाचे कार्ड घेऊन मिरवतात. या संघटनेच्या घाटावरील अध्यक्षाने चिखली तालुक्यातील एका गावाच्या अंगणवाडीत काही सामान ठेवलेले पाहून, ही अंगणवाडी बंद असल्याची बातमी छापतो, नाही तर दहा हजार रूपये द्या, अशी मागणी त्या अंगणवाडी सेविकेकडे केली. ती सेविकाही घाबरल्याने तिच्या पतीने सात हजार रूपये हातावर टेकवून हा विषय बंद केला. या अध्यक्षाचा 'प्रताप' काही चांगल्या पत्रकारांच्या कानावर पडताच त्यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, हा 'प्रताप' 'देशोन्नती'सारख्या चांगल्या दैनिकाचा वार्ताहरदेखील आहे. 


याच संघटनेच्या एका सदस्याने सिंदखेडराजा तहसीलदारांनी आपल्याला बैठकीला बोलावले नाही म्हणून, सोशल मीडियावर आदळआपट करत त्या तहसीलदारांविरोधात बदनामीची मोहीम उघडली. इतर सदस्यांनीही सामूहिक ट्रोलिंग केल्याने हा तहसीलदार घाबरला व त्याने थोडीफार तोडपाणी देऊन व माफी वैगरे मागून हा विषय बंद केला. 'ग्रामीण' पत्रकारांच्या संघटनेच्या नावाखाली वसुली करणार्‍या या टोळीबहाद्दरांना अधिकारी, कर्मचारी, व पोलिस चांगलेच वैतागले असून, हे सर्व पत्रकार टोळीने हल्ला चढवित असल्याने अधिकारी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत.


विशेष बाब म्हणजे, या टोळीबहाद्दर 'प्रताप'ला मुंबईतील एका वजनदार व बुलढाणा जिल्ह्यात चांगले नाव असलेल्या संपादकाने आपल्या राज्यस्तरीय न्यूज पोर्टलचे कोरे आय-कार्ड दिलेले असून, ही ओळखपत्रे तो आपल्या टोळीतील सदस्यांना देऊन बोगस पत्रकार बनवित आहे. ज्यांना बातमी लिहिता व वाचताही येत नाही, असे बोगस पत्रकार या प्रतिष्ठित न्यूजपोर्टलचे आयकार्ड घेऊन मिरवत असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील चांगले पत्रकार आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments