'पगाराच्या दुप्पट पैसे तुझी केस लढण्यावर खर्च करील, पण तुला सुट्टी नाही' !
- व्हाटसअप ग्रूपचे स्क्रीन शॉट 'बेरक्या'च्या हाती; पगार मागणार्या अकोला आवृत्तीतील कर्मचार्यांनाही थोरातची दमदाटी!
अकोला - शेतकरी चळवळीचे केंद्र असलेल्या अकोलासारख्या वर्हाडाच्या प्रांतात अजिंक्य भारत हे याच मातीत जन्माला आलेले दैनिक चालविताना संदीप थोरात या मालक-संपादकाने वैदर्भिय कर्मचार्यांना चक्क कार्यालयीन व्हाटसअप ग्रूपवरच दमदाटी केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. 'पगार मागितले तर देणार नाही', अशा शब्दांत त्याने कर्मचार्यांना तर ठणकावलेच; परंतु डीटीपी ऑपरेटर अमोल इंगळे याला चक्क 'तुला एक रूपया देणार नाही, काय करायचं ते कर, तुझ्या पगाराच्या दुप्पट खर्च तुझी केस लढविण्यावर करील, पण तुला सुट्टी नाही', अशी खुलेआम दमदाटी केल्याचेही उघडकीस आले आहे. थोरात याने डीटीपी ऑपरेटर असलेल्या इंगळे याला कालच दोन कोटीच्या अब्रुनुकसानीची नोटीस ई-मेलद्वारे पाठवली असून, त्याला 'लेखी माफी माग, व दोन कोटी भरून पावती घे', असे नोटिसीद्वारे सूचविले आहे. एका दलित कर्मचार्याचे आर्थिक शोषण करणे, त्याला वेतन न देता दमदाटी करणे, आणि त्याला सर्वांसमोर अपमानित करणे हा दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रोसिटी) कलम (३) (१) (८), कलम (३) (१),(१०), नुसार गुन्हा असतानाही संदीप थोरात व त्याचा मॅनेजर अविनाश कराळे याने हा गुन्हा तर केलाच; पण इंगळे याच्याकडून दोन कोटी रूपये उकळण्यासाठी त्याला वकिलामार्फत नोटीस पाठवून दबावात घेण्याचा प्रयत्नदेखील केला असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत थोरात व कराळे यांच्याविरोधात कायदेशीर व घटनादत्त लढाई लढण्याचा इरादा इंगळे याने 'बेरक्या'ला कळविला आहे. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गानेच या मुजोर अपप्रवृत्तीला प्रत्युत्तर देऊ, असेही इंगळे याने 'बेरक्या'ला कळविले आहे.
अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार पुरूषोत्तम आवारे-पाटील यांनी 'अजिंक्य भारत' हे दैनिक अकोल्यातून सुरू केले होते. त्याला वैदर्भिय जनतेने चांगला प्रतिसाद दिला. परंतु, चांगला परतावा मिळत असल्याने आवारे-पाटील यांनी हे दैनिक सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीचा मालक संदीप थोरात याला हस्तांतरित केले. त्यानंतर थोरात याने दैनिक देशोन्नतीने हकालपट्टी केलेल्या एका उपसंपादकाला आवृत्ती प्रमुखाच्या घोड्यावर बसवून त्याच्या हाती कोलित दिले. तेथेच या दैनिकाला उरती कळा लागली व शेवटी हे दैनिक बंद करावे लागले. परंतु, अकोला आवृत्ती बंद करताना कर्मचार्यांचे पगार देण्यास थोरात याने टाळाटाळ केली. पगार नसल्याने तेथील कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली, एका कर्मचार्याचे तर नोकरी गेल्याने लग्न मोडले, अमोल इंगळे या डीटीपी ऑपरेटरने व्हाटसअप ग्रूपवर तसेच खासगीरित्या थोरात यांना फोन करून आजारी असल्याने पगार देण्याची विनवणी केली. परंतु, ती धुडकविण्यात आल्याने व पगार मिळण्याची कोणतीही शाश्वती राहिली नसल्याने, तसेच पगार न देता थोरात हा 'तारीख पे तारीख'च देत असल्याने, अमोल इंगळे याने कामगार आयुक्त कार्यालयात केस दाखल केली. त्याचा राग मनात धरून संदीप थोरात याने मी सर्वांचे पगार करेन, पण इंगळेचा पगार करणार नाही, असे जाहीररित्या व्हाटसअप ग्रूपवर धमकावले.
इंगळे याने 'मी केस मागे घेतो, पण पगार द्या', अशी विनवणीही करून पाहिली, तरीही थोरातला दया आली नाही. शेवटी माझी फसवणूक झाली तशी इतरांची होऊ नये, या जनजागृतीच्या हेतूने अमोल इंगळे याने संदीप थोरातच्या कारनाम्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली. त्यानंतर थोरात अधिकच चवताळला. 'तुझ्या पगाराच्या दुप्पट पैसे तुझी केस लढण्यावर खर्च करील, पण तुला सुट्टी नाही', अशी धमकीच या थोरातने 'अजिंक्य भारत'च्या अकोला आवृत्ती ग्रूप'वर सर्व कर्मचार्यांसमोर दिली. तसेच, कुणी कर्मचार्याने ग्रूपवर पगाराची मागणी केली तर पगार देणार नाही, अशी दमदाटीही केली. मॅनेजर अविनाश कराळे यानेदेखील थोरात याचीच ग्रूपवर री ओढल्याचे दिसून येते आहे. हा अविनाश कराळे पूर्वी नगरमध्ये दैनिक पुढारीमध्ये जाहिरात मॅनेजर होता. परंतु, त्याने लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची बाब तत्कालिन एका निवासी संपादकाच्या लक्षात आल्यानंतर त्या संपादकाने ही बाब 'पुढारी'च्या मालकाला कोल्हापुरात जाऊन कळविली. 'पुढारी'ने या कराळेची महिनाभर सखोल चौकशी केल्यानंतर दहा लाख रुपयांचा घोटाळा उघड झाला. 'पुढारी' व्यवस्थापनाने या कराळेकडून हे पैसे तर वसूल केलेच; पण त्याची तातडीने 'पुढारी'तून हकालपट्टी केली व त्याचे नाव कायमस्वरुपी ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. आता हाच कराळे हा संदीप थोरात याला उलटे सल्ले देत असून, त्यामुळे थोरात याचे पाय आणखी खोलात जात आहे.
अमोल इंगळे याचे आर्थिक शोषण करणे, त्याला व्हाटसअपग्रूपवर सर्वांसमोर अपमानित करणे, आणि दोन कोटी रुपयांच्या वसुलीसाठी त्याच्यावर खोटे आरोप करत त्याला वकिलाची नोटीस पाठवणे हा प्रकार दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रोसिटी) कलम (३) (१) (८), कलम (३),(१),(१०), अनुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतानादेखील संदीप थोरात हा गुन्हा करत असल्याचे अमोल इंगळे याने 'बेरक्या'ला पाठविलेल्या विविध ई-मेल्समधून निदर्शनास येत आहे. या शिवाय, इंगळे याच्याविरोधात थोरात याने काल 'अजिंक्य भारत'मध्ये बातमी छापून, इंगळे याच्यावर खोटे आरोप करून, त्याला अडकविण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकारदेखील अॅट्रोसिटी कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याची बाब अनेक विधीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे अमोल इंगळे याच्याकडून दोन कोटी रूपये उकळण्याच्या नादात थोरात हा कायद्याच्या कचाट्यात अडकला असून, त्याने अकोला आवृत्तीतील कर्मचार्याचे केलेले आर्थिक शोषण चव्हाट्यावर आले आहे. आता संदीप थोरात याने जूनअखेर पगार देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अनेक पीडित कर्मचारी शांत आहेत, परंतु त्यांचे पगार या मुदतीत मिळाले नाही तर मात्र अकोला आवृत्तीतील पीडित कर्मचारी कायदेशीर लढा उभारणार आहेत. शिवाय, संदीप थोरात याच्या दोन कोटीच्या अब्रुनुकसानीपोटीच्या रक्कम मागणीविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार पीडित डीटीपी ऑपरेटर अमोल इंगळे याने 'बेरक्या'ला कळविला आहे.
ता.क.
संदीप थोरात याने 'अजिंक्य भारत' व 'सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स' कंपनीच्या अनेक कर्मचार्यांना चांगल्या पगाराचे आमिष दाखवून त्यांना कामावर तर घेतले; परंतु त्यांना पगारच दिले नसल्याने या कर्मचार्यांनी कामगार आयुक्त कार्यालयाचे दरवाजे ठोठावल्याचे अनेक प्रकरणे 'बेरक्या'ला प्राप्त होत आहेत. या संदीप थोरातविरोधात कॉ. भैरवनाथ वाकळे, कामगार संघटना महासंघ अहमदनगर यांनीदेखील कामगार आयुक्तांकडे धाव घेऊन त्यांच्या संघटनेचे सदस्य व सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीचे कर्मचारी सचिन शंकर गवळी यांच्या पगारासाठी कायदेशीर लढा दिलेला आहे. याबाबत कामगार आयुक्तांकडील सुनावणीलादेखील थोरात किंवा 'सह्याद्री'चे अधिकारी गेले नाहीत, ही बाबदेखील निदर्शनास आली आहे. या शिवाय, नगर येथील आणखी काही प्रकरणे 'बेरक्या'ला प्राप्त झाली असून, योग्यवेळी ती उघडकीस आणल्या जातील. थोरात, याने 'मी सर्वांना खिशात घालून फिरतो', या गुर्मीत राहू नये. या देशात संविधान आणि संविधानाचा कायदा लागू आहे, हे लक्षात ठेवावे. कायदा आपण म्हणू तसा वाकविता येतो, याही भ्रमात राहू नये. कर्मचार्यांच्या आर्थिक शोषणाचा घडा आता भरत आला असून, तो फुटण्याची वाट पाहू नये, असा सल्ला आम्ही त्यांना एक काळजीवाहू मित्र म्हणून देत आहोत. ''सुज्ञ असाल तर अधिक सांगणे न लगे...''!
0 टिप्पण्या