'बेरक्या'ने वृत्त प्रसारित करताच जूनअखेर पगार देण्यास संदीप थोरात तयार !

  अकोला आवृत्ती बंदच राहणार; जाहिरातबाकी असलेल्या कर्मचार्‍यांकडे वसुलीसाठी तगादा

      डीटीपी ऑपरेटरविरोधात दोन कोटींच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसची तयारी !

अकोला - मूळचा अकोला येथील असलेल्या व नंतर नगर येथून प्रकाशित होणार्‍या 'अजिंक्य भारत'चा बाजार उठल्याबाबत काल 'बेरक्या'ने वृत्त प्रसारित करताच नगरसह अकोल्यात एकच खळबळ उडाली. मालक-संपादक संदीप थोरात यांनी तातडीने 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न करत, अकोल्यातील कर्मचार्‍यांना जूनअखेर पगार करतो, असे आश्वासन दिले. तसेच, ज्या कर्मचार्‍यांकडे जाहिरात थकबाकी आहे, त्यांनी ती वसूल करावी, असेही सांगितले. परंतु, पेपरच बंद पडल्याने जाहिरात वसुली होत नाही, आमचा पगार द्या, असे अकोल्यातील कर्मचार्‍यांनी थोरात यांना सांगितले असल्याचे समजते. दरम्यान, 'बेरक्या'विरोधात नगरच्या तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी थोरात हे त्यांच्या 'बोलघेवड्या' मॅनेजरसह गेले होते. परंतु, पोलिसांनी ही 'फौजदारी नाही तर दिवाणी केस' असल्याची जाणिव त्यांना करून दिली. त्यामुळे थोरात यांनी आज 'अजिंक्य भारत'मध्ये फक्त अमोल इंगळे या अकोल्यातील डीटीपी ऑपरेटरविरोधात अब्रुनुकसानीप्रकरणी दोन कोटींचा खटला दाखल करत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, इंगळे हा दारूपिऊन कार्यालयात आल्याने, व गोंधळ घातल्याने त्याला काढून टाकल्याचे नमूद केले आहे. परंतु, अमोल इंगळे हा दलित समाजातील अत्यंत गरीब व्यक्ती असून, तो कधीही दारूला स्पर्शदेखील करत नाही, हे अकोल्यात सर्वांना माहिती आहे. त्यामुळे इंगळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय अकोल्यातील काही पत्रकार संघटना घेण्याच्या तयारीत आहेत.


अजिंक्य भारत व सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीच्या अनेक कर्मचार्‍यांचे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पगार झालेले नाहीत, त्यामुळे या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याबाबत काही कर्मचार्‍यांनी 'बेरक्या'ला ई-मेल करून आपली आपबिती कळवली होती. त्यानुसार, 'अकोला, नगरच्या अजिंक्य भारतचा बाजार उठला', या मथळ्याखाली 'बेरक्या'ने सडेतोडपणे वृत्त प्रसारित केले होते. हे वृत्त चोहीकडे व्हायरल होताच, सुरुवातीला 'मराठी उद्योजकाचे पाय ओढण्याचा प्रयत्न' म्हणून थोरात यांनी कांगावा सुरू केला. त्यानंतर बदनामी झाली म्हणून नगरच्या तोफखाना पोलिसांत धाव घेतली. त्यांना नेहमीच उलटे सल्ले देणारा एक बोलघेवडा मॅनेजर यावेळी त्यांच्या सोबत होता. परंतु, बेरक्याच्या वृत्तानंतर दणका बसलेल्या संदीप थोरात यांनी अकोला व नगरच्याही कर्मचार्‍यांचे पगार जूनअखेर करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 'बेरक्या'कडे दाद मागणार्‍या कर्मचार्‍यांनी 'बेरक्या'ला धन्यवाद दिले आहेत.


ता.क.

'बेरक्या' हा निर्भीड व सत्याचा पाठीराखा असून, संदीप थोरात यांनी नगरच्या पोलिसांना हाताशी धरून 'बेरक्या'च्या नावाखाली कुणावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास वाळकीसह इतरही भानगडी सविस्तरपणे चव्हाट्यावर आणल्या जातील. शिवाय, सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीतील इतरही 'गंमतीदार प्रकरणे' 'बेरक्या'पर्यंत पोहोचले आहेतच... आमचे संदीप थोरात यांच्याशी कोणतेही वैयक्तिक भांडण नाही. कर्मचारीवर्गाला पगार दिले जावेत, त्यांच्या लेकराबाळांचा घास हिरवला जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. कर्मचार्‍यांचे पगार झाले तर थोरात यांच्याशी आमचे नसलेले तात्पुरते वैर आपोआप संपून जाईल.

Post a Comment

0 Comments