अकोला, नगरच्या 'अजिंक्य भारत'चा बाजार उठला !

- मालक संदीप थोरातविरोधात अकोला कामगार आयुक्तांकडे तक्रारी दाखल

- नगर, अकोल्यातील कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ, अनेक महिन्यांपासून पगारच नाही

अकोला - नगर येथे मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या 'अजिंक्य भारत' या दैनिकाचा बाजार उठला आहे. या दैनिकाचा मालक संदीप थोरात याने कर्मचार्‍यांना गेल्या चार ते पाच ंमहिन्यापासून पगार देणे बंद केले असून, अकोला येथील कार्यालय कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्याने तेथील कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. या कर्मचार्‍यांचा पगारदेखील दिला गेलेला नाही, त्यामुळे त्यांनी अकोला येथील कामगार आयुक्त कार्यालयात तक्रारी दाखल केल्या असून, काही कर्मचार्‍यांनी सोशल मीडियावर पोस्टदेखील शेअर करून, संदीप थोरात या महाठगापासून सावध रहावे, असे आवाहन केले आहे. थोरात याच्या सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स या कंपनीतदेखील मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची नगर येथे चर्चा होत आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना नोकरी व एक लाख रूपये पगार देण्याच्या घोषणेमुळे सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीचा मालक संदीप थोरात हा राज्यात चर्चेत आला होता. परंतु, आता कांबळी यांनादेखील निर्धारित वेतन मिळाले नसल्याची माहिती हाती आली आहे. या शिवाय, अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार पुरूषोत्तम आवारे-पाटील यांच्याकडून अजिंक्य भारत हे दैनिक संदीप थोरात याने विकत घेतले होते.त्यासाठी सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीचा पैसा गुंतविण्यात आला होता, तसेच काही खासगी पार्टनरदेखील त्याने सोबत घेतले होते. वास्तविक पाहाता, हे दैनिक अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात चांगले चालत होते. परंतु, अकोल्यातील निष्क्रिय, व देशोन्नतीतून हकालपट्टी झालेल्या एका बोलघेवड्या उपसंपादकाला घोड्यावर बसवून थोरात याने त्याला संपादकाचे अधिकार दिले, आणि तेथेच हे दैनिक बुडायला सुरूवात झाली. अखेर अकोला येथील कर्मचार्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थोरात याने तेथील कार्यालयाला टाळे ठोकले व कर्मचार्‍यांचे पगारदेखील दिले नाहीत, त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांनी थोरात याच्याविरोधात अकोला येथील कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली असून, थोरात याच्यापासून सावध राहण्याची पोस्टदेखील सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

अकोल्यानंतर नगर येथील कर्मचार्‍यांचे पगारदेखील थोरात याने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून केलेले नाहीत. उलट त्यांना विविध आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अजिंक्य भारतमध्ये नगर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा पुण्यनगरीचे माजी संपादक रामदास ढमाले हे संपादक म्हणून रुजू झाले होते. परंतु, त्यांचाही पगार न दिल्याने त्यांनी कार्यालयात जाणेच बंद केले आहे. त्यामुळे संपादकाविना हे दैनिक पांगळे झालेले आहे. ढमाले यांच्यासोबत 'पुढारी' व इतर स्थानिक दैनिकांतून काही कर्मचारी मोठ्या पगाराच्या लालसेने आले होते. परंतु, आता त्यांचे 'तेलही गेले, तुपही गेले हाती धुपाटणे आले', अशी गत झाली आहे. 

नगरमध्ये 'अजिंक्य भारत' या दैनिकाचे हेलिकॉप्टरद्वारे लॉन्चिंग करून संदीप थोरात यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. पहिल्याच दिवशी हेलिकॉप्टरने आलेला 'अजिंक्य भारत'चा अंक मात्र दुसर्‍या दिवशी कुठेच दिसला नाही. 'हवेतून आला आणि हवेत गायब झाला', अशी गत या दैनिकाच्या अंकाची झाली आहे. अंकाचा सुमार दर्जा, जाहिरातीचे उत्पन्न कमी आणि बेसुमार खर्च, आणि झालेली 'खोगीरभरती' यामुळे या दैनिकाचे अवघ्या सहा ते सात महिन्यांत दिवाळे वाजले असून, हे दैनिक नगरमध्ये शेवटची घटका मोजत आहे. सह्याद्री मल्टिसिटी फायनान्सच्या एका शाखेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची नगरमध्ये चर्चा असून, त्यामुळे थोरातचे पाय आर्थिक खोलात गेले आहेत. त्यामुळे फायनान्स कंपनी व 'अजिंक्य भारत'च्या कर्मचार्‍यांचे पगार करण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments