'तारीख पे तारीख'ला कर्मचारी वैतागले; 'अजिंक्य भारत'च्या संदीप थोरातविरूद्ध कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल!

अकोला, नागपुरातील कर्मचारी पगारासाठी ठोठावणार कोर्टाचे दार !

 'अजिंक्य भारत'ची वाट लावून अविनाश कराळेने उठविली राजीनाम्याची हूल !

अकोला - 'अजिंक्य भारत' या दैनिकाचा पुरता बाजार उठला असून, या दैनिकाची मातृसंस्था असलेल्या सह्याद्री मल्टिसिटी फायनान्समध्ये कोट्यवधींचा घपला झाल्याने, या दैनिकाचा मालक-संपादक संदीप थोरात हा आर्थिक अडचणीत आला आहे. दैनिकाचे व्यवस्थापन सांभाळण्याचा अनुभव नसतानाही केवळ बोलबच्चनगिरी करणार्‍या अविनाश कराळे याच्यामुळे विदर्भात नावारूपाला आलेले हे दैनिक बंद पडले असून, नगरमध्येही वितरकांसोबत कुरबुरी सुरू असल्याने काही ठिकाणी वितरण बंद झालेले आहे. तसेच, कर्मचार्‍यांचे पगार रखडल्याने कर्मचार्‍यांनीही नगरमध्ये कामावर येणे बंद केले आहे. पगार न करता केवळ 'तारीख पे तारीख'च मिळत असल्याने अकोल्यातील संतप्त कर्मचार्‍यांनी अखेर कामगार आयुक्तांकडे संदीप थोरात व अविनाश कराळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, आमचे वेतन मिळवून द्यावे, अशी मागणी कामगार आयुक्तांकडे केली आहे. धक्कादायक बाब अशी, की थोरात याने या कर्मचार्‍यांचा पीएफदेखील भरला नसल्याची माहिती मिळत असून, त्यामुळे नागपूर व अकोल्यातील कर्मचारी लवकरच पीएफ कार्यालय, पोलिस व कोर्टातदेखील धाव घेणार आहेत.


'अजिंक्य भारत'चा मालक-संपादक संदीप थोरात, व व्यवस्थापक अविनाश कराळे यांच्याविरोधात अकोल्यातील तब्बल १२ कर्मचार्‍यांनी सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला यांच्या कार्यालयात काल, दि.२७ जूनरोजी लेखीस्वरूपात तक्रारअर्ज दाखल केला आहे. या अर्जात नमूद आहे, की थोरात-कराळे यांनी आम्हाला 'अजिंक्य भारत' या दैनिकात विविध पदांवर नेमणूक दिली. तसेच, जानेवारी २०२३ पर्यंत वेतनही अदा केले. परंतु, २३ मार्च २०२३ पासून अचानक अकोला आवृत्ती बंद करत असल्याचा ई-मेल पाठवला. त्यावेळी आमचे फेब्रुवारी २०२३चे वेतनही अदा केलेले नव्हते. अचानक कार्यालय बंद केल्याने आम्ही सर्व बेरोजगार झालो, परंतु थोरात व कराळे याने एप्रिल २०२३ पर्यंतचे वेतन अदा केले जाईल, असे आश्वासित केल्याने तेव्हापासून आम्ही वेतन होण्याची वाट पाहात आहोत. 'अजिंक्य भारत' व्यवस्थापनाकडे फेब्रुवारी ते एप्रिल २०२३ असे तीन महिन्यांचे वेतन बाकी असून, वेतन मागण्यासाठी संपर्क साधला असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कामगार आयुक्तांकडे तक्रार केल्यास अनिश्चितकालीन वेळ लागेल, अशी धमकी अविनाश कराळे हा देतो. तीन महिन्यांचे थकीत वेतन आणि आता जूनअखेरपर्यंत पगाराविना थांबल्याने झालेले नुकसान पाहाता, कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.


तरी, आमचे तीन महिन्यांचे वेतन मिळवून द्यावे, तसेच थोरात व कराळे या जोडगोळीने भविष्यनिर्वाह निधी (पीएफ)च्या नावाखाली जानेवारी २०२३ पर्यंत वेतन कपात केलेली आहे. ही रक्कम आमच्या भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यात जमा केली किंवा नाही, याची कोणतीही माहिती मिळत नाही. तसेच, भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडून प्राप्त होणारा 'यूएएन' नंबरदेखील कुणाला दिलेला नाही. याबाबत विचारणा केल्यास 'यूएएन' (पीएफ क्रमांक) येण्यास वेळ लागतो, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे वेतनातून कपात केलेली पीएफची रक्कमदेखील आमच्या पीएफ खात्यात जमा केली की नाही, याबाबत अनभिज्ञ असल्याचे या तक्रारअर्जात नमूद असून, आमचे वेतन तातडीने मिळवून द्यावे, व भविष्यनिर्वाह निधीच्या रकमेचीदेखील माहिती तातडीने द्यावी, अशी विनंती या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.


या अर्जावर 'अजिंक्य भारत'चा अकोला आवृत्तीप्रमुख नीलेश पोटे यांच्यासह एकूण बारा कर्मचार्‍यांच्या सह्या आहेत. विशेष बाब म्हणजे, नीलेश पोटे, व इतर कर्मचार्‍यांनी संदीप थोरात व अविनाश कराळे यांना व्हाटसअप ग्रूपवर पगार देण्याबाबत केलेल्या विनंतीचे स्क्रीनशॉटही 'बेरक्या'ला प्राप्त झालेले आहेत. केवळ अकोलाच नाही तर नागपूर कार्यालयातील कर्मचार्‍यांचे पगारदेखील संदीप थोरात व अविनाश कराळे या जोडगोळीने दिले नसून, कामगार आयुक्त कार्यालयांकडे तक्रार केल्यानंतर हे सर्व कर्मचारी पीएफ कार्यालय, पोलिस ठाणे व कोर्टातदेखील पगारासाठी दाद मागणार आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात कराळे व थोरात या जोडगोळीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

कराळे म्हणतो, 'बेरक्या'ला माहिती देऊ नका!

दैनिक पुढारीमध्ये जाहिरात मॅनेजर असताना मोठा आर्थिक घोटाळा केल्यामुळे पैसे भरून घेऊन हकालपट्टी झालेला अविनाश कराळे हा 'अजिंक्य भारत'मध्ये मॅनेजर म्हणून आला; आणि या दैनिकाचे व्यवस्थापन कोलमडले. संदीप थोरात याला उलटेसुलटे सल्ले देण्याचे काम याच कराळे याने केले असून, त्यामुळे अकोलासह वर्‍हाडामध्ये चांगले चांलणारे हे दैनिक बंद पडले. आता नगरमध्येदेखील हे दैनिक शेवटच्या घटका मोजत आहे. वितरकांचे पैसे थकविले गेल्याने अनेकांनी अंक बंद केला आहे. तसेच, नगरमध्येही कर्मचार्‍यांचे पगार नसल्याने या कर्मचार्‍यांनी कामावर येणे बंद केले आहे. संपादकाविना या दैनिकाचे व्यवस्थापन चालू असून, ज्येष्ठ पत्रकार व संपादक रामदास ढमाले यांनीही कार्यालयात जाणे थांबविले आहे. दैनिकाला वाचक आणि बिझनेस दोन्ही नसल्याने या दैनिकाची आर्थिक बाजू कोलमडून पडली आहे. अकोल्यातील कर्मचार्‍यांना १५ दिवसांत पगार करू, असे आश्वासन अविनाश कराळे याने १० जूनला दिले होते. २५ जूनला कर्मचार्‍यांनी त्याला पगारासाठी फोन केला असता, 'मीच राजीनामा दिला आहे', असे त्याने सांगून हात वर केले. त्यानंतर व्हाटसअप ग्रूपवर मेसेज टाकत, २६ जूनला चेकबुक प्राप्त झाले आहे, पोस्ट डेटेड चेक (पीडीसी) पाठवतो, असे नमूद केले. परंतु, २७ तारखेपर्यंतही चेक न मिळाल्याने कराळे व थोरात यांची लबाडी कर्मचार्‍यांच्या लक्षात आली, व या संतप्त कर्मचार्‍यांनी कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

विशेष बाब म्हणजे, या कराळेने घडलेल्या प्रकाराबाबत 'बेरक्या'ला माहिती पाठवू नका, अशी विनवणीही करून पाहिली. परंतु, त्याच्याच पोस्टच्या स्क्रीनशॉटसह ही माहिती कर्मचार्‍यांनी 'बेरक्या'ला पाठवली आहे. आता कराळे याने पुन्हा 'तारीख पे तारीख' दिली असून, पोस्ट डेटेड चेक पाठवतो, १५ दिवसांत पगार करू, असे आश्वासन तो देत आहे.

ता.क....

संदीप थोरात यांना पत्रकारांचा पाठीराखा म्हणून आम्ही विनंती करतो, की आपण तातडीने अकोला, नागपूर व नगर येथील कर्मचार्‍यांचे रखडलेले पगार विनाविलंब देऊन टाकावेत. पत्रकार हा कष्टकरी घटक असून, पगाराशिवाय त्याच्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. 'बेरक्या'चे आणि आपले वैर नाही. सह्याद्री मल्टिस्टेटमधील आर्थिक गैरप्रकारामुळे आपली आर्थिकस्थिती खराब झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तसेच, आपल्या फायनान्स कंपनीत काय झाले, आपल्या कार्यालयात काय काय सुरू आहे, आपण सद्या काय आर्थिक उलाढाली व आर्थिक खड्डे बुजविण्याचे उद्योग करत आहात, याचीही माहिती 'बेरक्या'ला प्राप्त झाली आहे. आपल्याविरोधात एकूण ९ गोपनीय तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. परंतु, या तक्रारींत आम्हाला स्वारस्य नाही. आपण तेवढे कर्मचारीवर्गाचे पगार दिलेत, तर आमचा आपल्याशी असलेला लढा संपेल. आपले चारित्र्यहनन किंवा बदनामी करणे यात आम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाही. पत्रकारांच्या हक्कासाठी आम्ही आपल्याशी लढत राहू, घाबरत तर आम्ही कुणाच्या बापाला नाही, हेही आपण लक्षात घ्यावे. तेव्हा तातडीने कर्मचार्‍यांचे पगार देऊन टाका, व एकदाचा हा विषय संपवा, असा आमचा मित्र म्हणून आपल्याला सल्ला असेल.


Post a Comment

0 Comments