मराठी 'मीडिया'ला काय डसलंय ? जनहिताचे विषय सोडून गौतमी पाटीलचीच चर्चा ...



दर्जा,कमाई,पाटीलकी,लगीन ऑफर,आता बाप शोधला !

गौतमी पाटीलच्या नाचगाण्याचा दर्जा-गुणवत्ता,तिची वरचढ कमाई,तिची खरी जात,खरे आडनाव आणि तथाकथित पाटीलकी,तिला आलेली लगीन ऑफर, सगळं दळून,पाखडून,उफणून झालं....आता काय ? तर अखेर मीडियाने गौतमी पाटीलचा बाप शोधला ! इतकेच नाही त्याची मुलाखत घेतली.ती ही गावात गाठून....निष्कर्ष काय तर तो नेरपगार निघाला ! म्हणजे गौतमीचे आडनाव पाटील.तिच्या आईचे आडनाव चाबुकस्वार आणि बापाचे आडनाव नेरपगार ! काय पण शोध पत्रकारिता ! व्वा रे पठ्ठे !! भले शाब्बास !! याला म्हणतात पत्रकार !!! आल्तु फालतू नकोच,नोबेल पुरस्कारच द्यायला हवेत तुम्हाला.


एका हुल्लडबाज 'नाची'च्या भंगार म्हणून टाकलेल्या दारुड्या बापाची मुलाखत ! तो तर पिलेला होताच,पण मुलाखत घेणारा तरी शुद्धीवर होता का ? चॅनलवाले शुद्धीवर नव्हते हे तर ती महान उदबोधक समाज प्रबोधक मुलाखत लाईव्ह प्रसारित झाली त्यावरूनच कळले.पण पब्लिक ? त्यांनीही याची 'मजा' घेतली ! हे सगळं शहाण्या माणसांनी बेशुद्ध पडावं इतकं भयानक आहे.


मराठी मीडियाला नेमकं काय डसलंय ? हे आम्हाला सांगेल का कोणीतरी ? एक तर राजकीय कुलंगडी भानगडी नाहीतर मग गौतमी..गौतमी..गौतमी ! ज्याच्या त्याच्या तोंडी गौतमी ! असं काय आहे तिच्यात ? म्हणजे तिच्या गाण्यात,नाचण्यात,अदाकारीत ? ज्याने अख्खा महाराष्ट्र फिदा व्हावा,पब्लिक बेभान होऊन चेकाळवं,लोक तिच्या कार्यक्रमाला गर्दी करतात म्हणून ज्यांच्याकडे तिच्यावर उधळायला बक्कळ पैसा आहे असे गावगन्ना पुढारी तिचे कार्यक्रम लावतात.तिला मुहबोली सुपारी देतात.तिच्या कार्यक्रमात राडे-धिंगाणे होतात,चेंगराचेंगरी-हुल्लडबाजी-मारामाऱ्या होतात.राजकीय मंडळींना फुटेज हवे असते.म्हणून ते तिच्या बद्दल काहीतरी बोलतात.


काही लोकांना प्रसिद्धी हवी असते म्हणून ते तिच्या गाण्यात-नाचण्यात-हावभावात,अश्लीलता शोधतात.हा लावणी आणि लोककलेचा अपमान आहे म्हणतात.कोणी तिची कमाई मोजतात.कोणी ती महाराष्ट्राचा बिहार करतेय म्हणतात,कोणी तिला लग्नाची ऑफर देतात,कोणी स्वतःच्या,कोणी मुलाबाळांच्या तर कोणी चक्क बैलाच्या  वाढदिवसाला तिचे कार्यक्रम ठेवतात.एकाने तर चक्क बायकोच्या वाढदिवसाला आणि दुसऱ्या पठ्ठ्याने सत्यनारायणाच्या कार्यक्रमात गौतमीचा नाच ठेवला.आता फक्त हरिनाम सप्ताह,धार्मिक सण-उत्सव,यात्रा,जत्रा,  गणपती,नवरात्र,महापुरुषांच्या जयंत्या -मयंत्या,लग्न-मुंजी,दहावे-तेरावे,अंत्यविधीच बाकी आहेत.कोणी सांगावे येणाऱ्या काळात तिथेही 'सबसे कातील-गौतमी पाटील' दिसेल ! बाकी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या राजकीय प्रचारसभांसाठी तर तिची बुकिंग सुद्धा सुरु झाली आहे म्हणतात.


  काही लोक तर तिच्या खासगी आयुष्यापर्यंत गेले,म्हणजे तिची आई,बाप,गाव,आडनाव,जात इत्यादी.कोणीतरी म्हणाले ती पाटील नाही तर चाबुकस्वार आहे.त्यावरही गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली.काही जणांनी तर तिचा बाप शोधून काढला.रवींद्र बाबुराव नेरपगार-पाटील.त्याची मुलाखत.तो पिलेला,आणि मीडियावाले विचारताहेत,तुमच्यात आणि त्यांच्यात काय बिनसलं,तुम्ही वेगळे का राहता.गौतमीला इतकी प्रसिद्धी आणि पैसा मिळतोय ;तुम्हाला काय वाटतं ? त्याला काय वाटतं ते जाऊद्या परंतु त्या बेवड्याची बकवास मुलाखत घेणाऱ्या टवाळखोर पत्रकारांची आणि ती मुलाखत चॅनलवर दाखवणाऱ्या 'टीआरपीबाज' चॅनल्सची मात्र आम्हाला लाज वाटली.लोक पाहतात म्हणून तुम्ही काहीही दाखवणार ? गौतमी पाटीलच्या हागण्या-मुतण्याच्या बातम्या.त्यावर चर्चा.मुलाखती.सोशल मीडियाचं जाऊद्या ; इलेट्रॉनिक आणि प्रिंट मीडियानेही तिच्या नखापासून झींज्याच्या टोकापर्यंतच्या सगळ्या गोष्टींची चर्चा करावी.त्याच्या बातम्या आणि स्पेशल स्टोरी कराव्यात.लाज नाही वाटत !


  महाराष्ट्रातील सर्व प्रश्न सुटले आहेत.शेते पिकांनी डोलत आहेत. शेतकरी आनंदी आहेत.गोर-गरीब सुखी आहेत.सर्वसामान्य लोक समाधानी आहेत.सगळ्यांच्या हाताला काम धंदा रोजगार आहे.कोणीही उपाशी नाही.कोणीही बेरोजगार नाही.सगळीकडे आबादी-आबाद आहे.महागाई असली तरी तिचे चटके जाणवत नाहीत.उलट सगळ्यांना ती सावलीसारखी वाटत आहे.भ्रष्टाचार संपलाय.कुठे चोरी होत नाही.कोणी कोणाला लुटत लुबाडत नाही.खून-दरोडे-बलात्कार-शोषण काहीही होत नाही.गुन्हेगारी शून्यावर आली आहे.सर्व धर्म जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत.कुठेही भांडण,तंटा,वाद,राडे,दंगे-धोपे दंगली होत नाहीत.सगळे एकमेकांशी एकोप्याने आणि सलोख्याने वागत आहेत.थोडक्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या रूपात महाराष्ट्रात 'रामराज्य' अवतरले आहे.अशा या रामराज्यात सुख-समाधान इतके ओसंडून वहात आहे की लोकांना त्याचे अजीर्ण व्हायची वेळ आली आहे.अशा वेळी हे सुख पचायला 'मुखशुद्धी' हवी.महाराष्ट्रातील मराठी मीडिया सध्या हेच महाकार्य करीत आहे.होय ! 'गौतमी पाटील' ! हीच ती मुखशुद्धी !!  

  'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला.त्यात त्याला वृश्चिक दंश झाला, वर्णाव्या काय मग तयाच्या लीला' अशीच सध्या मीडियाची अवस्था झाली आहे.ज्या पद्धतीने गौतमी पाटीलच्या बातम्यांना मीडियात प्रसिद्धी दिली जातेय ते सगळे संशयास्पद देखील आहे.हा केवळ मीडियाच्या टीआरपीचा खेळ नाही.किंवा आंबट शोकींन वाचक-प्रेक्षकांची हौस भागवण्याचाही प्रकार नाही.हा मीडिया ट्रायल आहे.जनतेला भरकटवण्याचा मीडिया ट्रायल.केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दळभद्री कारभार आणि अपयशावर पडदा टाकण्यासाठीचे मीडिया ट्रायल ! महागाई-बेकारी-बेरोजगारी,शेतकऱ्यांचे बेहाल हे सगळं गौतमी पाटीलच्या बातम्यांपुढे फिके आहे.खरेच गौतमी पाटील,सबसे कातील आहे ; सरकार पेक्षाही 'काकण'भर अधिक

- रवींद्र तहकिक 

७८८८०३०४७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या