चारित्र्यसंपन्न व्याभिचारी



स्तंभ लेखनाच्या निमित्ताने का होईना पत्रकारितेत मुलुखगिरी केल्यामुळे  शिरिष कणेकर यांच्यावर 'बेरक्या' मध्ये लिहायला हवे.असो ; तर शिरिष कणेकर गेले.जगण्याची 'ऐशी'(८० वर्ष जगले)आणि वागण्याची 'तैशी'(हे काय सांगायला हवे)करून गेले.असंस्कृतपणाचा दोष स्वीकारुन 'बरे गेले' असे म्हणावे लागेल.एकेकाळी महाराष्ट्राच्या अडीच पिढयांना खूळ लावलेल्या पण आताशा खुळखुळा होऊन समृद्ध अडगळीत पडलेल्या जुन्या 'मर्फी रेडीओ' सारखी झालेली कणेकरांची अलीकडच्या काळातील अवस्था बघवत नव्हती.त्या अर्थाने ते सुखासुखी गेले.हे बरेच झाले.म्हणजे ते कालबाह्य झाले होते असे नव्हे.त्यांच्यातली कलाधर्मी उर्मी संपली होती असेही नव्हे.ते थकले अथवा कंटाळले होते असेही नव्हे.पण एखादे खणखणीत चलनी नाणे सुध्दा जरा जास्तच फिरले तर अखेरीस गुळगुळीत होऊन खोटा सिक्का ठरते ना ; तसे काहीसे कणेकरांचे झाले होते.


त्यांनी स्वतःला जरा जास्तच वापरले.त्यांच्याकडे गुणवत्ता होती.कला होती.कलेला दर्जा होता.पण त्यांच्याकडे मर्यादा नव्हती.म्हणजे हा माणूस कायम हपापलेला होता.पैसा किंवा प्रसिद्धीसाठी,सन्मान किंवा पुरस्कारासाठी नाही.लिहिण्यासाठी आणि लिहिलेलं दुसऱ्यांना सांगण्यासाठी.मग त्यासाठी माध्यम काहीही चालत असे.एखादे वर्तमानपत्र.साप्ताहिक,मासिक-पाक्षिक,दिवाळी अंक,कॅलेंडर,एखादा विशेषांक,एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभारप्रदर्शन,पाहुण्यांची ओळख,प्रमुख पाहुणेपद किंवा अध्यक्षपद असे काहीही.कणेकर मुलाखत देण्याचे आणि घेण्याचे असे दोन्ही कार्यक्रम करीत असत.शिवाय थिएटरवर स्टँडअप कॉमेडी वजा एकपात्रीप्रयोग ! स्तंभलेखनाची संकलित पुस्तके.असं बरच काही.एवढं करून याची सांगण्याची भक संपत नसे.मग दादरच्या शिवाजी पार्कवर मॉर्निग वोकच्या किंवा संध्याकाळच्या कट्ट्यावरच्या गप्पाष्टकाच्या निमित्ताने,किंवा आवर्जून कोणाला गाठून,अगदी फोनवरही हा गप्पाड्या त्याचं फुगलेलं पोट आणि भरलेलं डोकं रिकामं करीत असे.असा हा माणसाळलेला 'पांडा'.तासंतास-हप्तान-हप्ता,महिन्यांमागून महिना,वर्षभर मुंबईच्या दमट हवेत,एका बंदिस्त अपार्टमेंटच्या ११ मजल्यावर,थ्री-बीएच-के फ्लॅटमधील १२ बाय १५ च्या अटॅच रूममध्ये एकाकी एकटाच बसून किंवा पडून कसा राहू शकेल.भले तिथे त्याला वाचायला ढीगभर पेपर,टीव्ही,कम्प्युटर विथ इंटरनेट असो.मोबाईल असो.सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून राहून तरी किती राहणार ?


 शिरीष कणेकरांना हे असले उसने जगणे असह्य झाले होते.त्यात अलीकडे त्यांना त्यांच्या खास पठडीतले वाचक प्रेक्षक चाहतेही राहीले नव्हते.त्यांच्या शैलीदार मार्मिक आणि उपरोधिक विनोदाला समजून उमजून दाद देऊ शकेल असा वाचक प्रेक्षक श्रोताच महाराष्ट्रात आता उरला नाही .याची त्यांना अखेरच्या काळात प्रचंड खंत होती.मला नाही तरी माझ्या परंपरेतील वक्त्याला जाणकार श्रोता मिळावा,महाराष्ट्राचे हे सांस्कृतिक मानस सजग रहावे ही त्यांची अखेरच्या काळातील आस होती. पण काळाची पावले उलटी फिरली आहेत.महाराष्ट्रात आता अत्रे, ठाकरे, पुलं,वपु,कणेकर होणे नाही.हे मणभर ओझे मनावर घेऊन कणेकर गेले.गेलेल्या व्यक्ती बद्दल चांगलेच बोलायला हवे.कारण अर्थात 'मराणांती  वैराणी' हा आपला संस्कार.हा संस्कार ज्याने कोणी रुढ केला तो नक्कीच अट्टल पुणेकर असला पाहिजे.कारण जीवंतपणी हे (पुणेकर) कोणाला त्यांची टरफले काढू देत नाहीत.(सांस्कृतिक दहशत)आणि मेल्यावर कोणी यांच्या उपद्व्यापांचे उत्खनन करु नये यासाठी 'मरणांती वैराणी'! (ही सांस्कृतिक तरतूद) वास्तविक शिरिष कणेकर यांच्याशी आमचे कुठल्याही प्रकारचे ; म्हणजे खासगी,सार्वजनिक,सांस्कृतिक,वैचारिक वैर असण्याचे कारण नव्हते.


आता जे जिवंतपणी नव्हते ते मरणांती काय संपवणार? पण तरी शिरिष कणेकरांबद्दल आम्हाला कायम एक सुप्त असूया राहिलेली आहे.ती म्हणजे जीवंतपणी (अर्थात त्यांच्या) त्यांची त्यांच्याच शैलीत खिल्ली उडवता आली नाही याची.म्हणजे तशी हिम्मतच झाली नाही.हे अगदीच अशक्य होते असे नाही.पण भीती होती प्रतीक्रीयेची.म्हणजे आपण करायला जावे त्यांचा मारोती आणि व्हायचा आपलाच गणपती ! कणेकर जितके खुसखुशीत होते तितकेच खवटही होते.म्हणजे त्यांचा विनोद थेट अत्र्यांच्या सारखा पातळी सोडून धोतरात शिरणारा नसला तरी पुलंच्या सारखा सत्यनारायणाचा प्रसादही नव्हता.म्हणून आम्ही त्यांच्या वाटेला गेलो नाहीत. चित्रपट आणि क्रिकेट या दोन विषयावर कणेकरांनी प्रचंड लिहीले.इतरही म्हणजे राजकारण,संगीत,गाणी,गायक यावरही त्यांनी विपुल लेखन केले.माझी फिल्लम बाजी,कणेकरी,फटकेबाजी,हे त्यांचे टॉक शो विशेष गाजले.अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी या संबधाने स्तंभ लेखनही केले.त्यांची काही पुस्तकेही गाजली.त्यांच्या लेखन आणि विनोदाची एक विशेष ढब होती.विनोद  निर्मितीच्या बाबतीत ते चारित्र्यसंपन्न व्याभिचारी होते.सिनेमा-क्रिकेट-राजकारण आणि कलाक्षेत्रातल्या सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत सभ्यता न सोडता मनसोक्त किस्सेवजा चहाटळपणा करण्याची एक खास खुबी त्यांना साधली होती.त्यांचे विनोद आणि वर्णित विषय अर्थात शहरी मध्यमवर्गीय,त्यातही पुणेरी आणि मुंबईकर प्रेक्षक श्रोते आणि वाचकांसाठीच होते.उर्वरित महाराष्ट्रातील वाचक प्रेक्षक श्रोत्यांशी त्यांची फारशी नाळ कधी जुळली नाही.


ते विदेशातही गेले.कार्यक्रम करुन आले.पण प्रेक्षक श्रोते अर्थातच पुणेकर आणि मुंबईकरच.ही एक मर्यादा या अफाट कलंदर हरहुन्नरी कलावंताला नक्कीच होती.म्हणजे त्यांच्या या उणीवेवर त्यांच्या मृत्यूनंतर बोट ठेवणे सभ्यतेत बसत नसले तरी कणेकरांसाठी हा नियम मोडला जाऊ शकतो.लेखनाच्या,वकृत्वाच्या विनोदाच्या सगळ्याच चौकटी आणि मर्यादा ओलांडून या अवलीयाने स्वतः चा एक आगळा वेगळा आकृतीबंध निर्माण केला,आणि तो प्रयत्नपूर्वक चिकाटीने  रेटून नेला.यशस्वी करुन दाखवला.समिक्षेच्या दृष्टीने त्यात त्रूटी दोष नक्कीच होते.आक्षेपार्ह देखील बरेच काही असे.सर्वात महत्वाचा दोष म्हणजे पाल्हाळीक किस्सेबाजपणा आणि तोच तो पणा.त्यांच्या रसगुल्ल्यात पाक जरा जास्तच असायचा.त्यापेक्षाही त्यांचा कोणत्याही प्रसंगात कायम मधे तडमडणारा 'मी'! त्याचा अतिरेक रसभंग करतो हे लक्षात येऊनही कणेकरांनी बिघडलेल्या वांड पोरासारखे या मध्येच घुसणाऱ्या 'मी' ला कायम लाडाने पाळले आणि  पोसले.कणेकरांच्या जीवनप्रवास आणि त्यांच्या लेखन, वाक्पटुत्व तसेच कथनशैली बद्दल बरेच काही लिहून येईल.पण त्यांच्या चारित्र्यसंपन्न व्याभिचारीपणाबद्दल कोणी बोलणार नाही.आम्ही हा प्रमाद यासाठी केला की जवाब द्यायला कणेकर आता हयात नाहीत.ते नेहमी म्हणायचे की 'मेलो तरी मी तुझी पाठ सोडणार नाही,मसणातून येऊन मानगुटीवर बसेल' ! पण माझा त्यांच्या या थापेबाजीवर अजिबात विश्वास नाही...

- रवींद्र तहकिक

७८८८०३०४७२ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या