'साम’ चॅनलचा डेटा चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखलपुणे : ‘साम टीव्ही’ वृत्तवाहिनीतील जाहिरात विभागाच्या व्यवसायाचा महत्त्वाचा तपशील मेलद्वारे पाठवून संगनमताने विश्‍वासघात केल्याप्रकरणी दोघांवर मालमत्तेच्या फौजदारी अपहाराविषयीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘साम’मधून डेटा पाठविणारा आणि तो डेटा घेणारा अशा दोघांवर शुक्रवारी (ता. १४) विश्रामबाग पोलिसात हा गुन्हा दाखल झाला आहे.


भगवान बाबाराव जाधव (वय ४०, सध्या रा. वसंत विहार, वडगाव बुद्रुक) आणि अजय महादेव पेटकर (रा. महिंद्रा अंतिया, खराळवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ यांनी याबाबत फिर्याद दिली. सहा जुलैला हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हा ‘साम’मध्ये जाहिरात विभागात कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वी त्याची ‘सकाळ’च्या पुणे कार्यालयात जाहिरात विभागात बदली करण्यात आली होती. सी. बी. डी. बेलापूर नवी मुंबई येथील स्टुडिओ व ‘साम’च्या जाहिरात विभागाचा डेटा हाताळण्याचा कोणताही अधिकार त्याला देण्यात आलेला नव्हता.


पेटकर एप्रिल २०२३ पर्यंत ‘साम’साठी पुणे कार्यालयातून जाहिरात व्यवसायाचे काम पाहत होता. त्यानंतर तो दुसऱ्या वृत्तवाहिनीत रुजू झाला आहे. सहा जुलैला जाधव याने त्याच्या वैयक्तिक मेलवरून ‘साम’चा गेल्या दोन वर्षांतील व्यवसायाचा महत्त्वाचा तपशील पेटकर याला त्याच्या मेलवर पाठविला. ‘साम’चा जाहिरात विभाग व व्यवसायाचा महत्त्वाचा तपशील तसेच इतरही व्यावसायिक माहिती स्पर्धक चॅनेलला पुरविल्याने ‘साम’चे व्यावसायिक तसेच आर्थिक नुकसान झालेले आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जाधव याने आणखी कोणता तपशील पाठवला आहे? कोणत्या उद्देशाने हा तपशील पेटकर याला पाठविण्यात आला? यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा सविस्तर तपास पोलिस करत आहेत.


या गुन्ह्यातील आरोपींकडून तपशील हस्तगत केला जाणार आहे. त्यानुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच आम्ही सायबर गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करत आहोत. तपशीलाचा अपहार करण्यामागे आरोपींचा नेमका हेतू काय आहे, हे तपासातून निष्पन्न होईल ...- - संदीपसिंग गिल, पोलिस उपायुक्त, झोन १


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या