बातम्यांचं जगच वेगळं असतं. डोईजड होऊ नये म्हणून नेमलेल्या बॉसला टांग मारून "दादा"गिरी सुरू होते, तेव्हाच पुढील चित्र काय असेल, ते दिसू लागते. आपणच बसविलेल्या माणसांच्या अधिकारावर "तुळशी"पत्र ठेवून "प्रसन्न"पणे अगदी "नम्रता"पूर्वक काहीजण थेट "घुसविले जातात". त्यात सारा प्रवास अंबाबाईला प्रदक्षिणा घालूनच करावा लागतो म्हटल्यावर राजकारण येणारच. राजकारण हा तर आत्मा! राजकारण आले की जनता कशी येणार?
इकडचा-तिकडचा सर्व गाळ, टाकावू माल पंचगंगेतून वाहून येत अंबाबाईच्या दारी येणारच. लिंबू-टिंबूंनी बदल घडवायची स्वप्ने पाहणे म्हणजे फारच मोठे धाडस! ते कागदावर कितीही सुखद वाटत असले तरी प्रत्यक्षात उतरणे अवघडच. हार्डकोअर जर्नालिझम माहिती नसलेली माणसे थेट महत्त्वाच्या भूमिकेत शिरली तर सावळा गोंधळ होणारच. शेवटी काहीही झाले तरी या सर्वांचे मूळ, कोअर आणि आत्मा आहे ते जर्नालिझम, कंटेंट आणि तेही आक्रमक! पालकाच्या मूळ स्वभावाला अनुसरून बालकात ॲग्रेसन नसले की मग नवे अपत्य मिळमिळीत, बुळबुळीत, गुळगुळीतच निपजणार. असे नवे काही आले काय आणि गेले काय, फरक काय पडतो? दखल कोण घेणार? सॉफ्ट कंटेंट घेऊन यूट्यूब चॅनेल चालविले म्हणजे पत्रकारितेची सर्व अंग माहिती झाली असे होत नाही.
पुरवणी लावणाऱ्या संपादकाला थेट रात्रपाळीत पान 1 लावायला उभे केले तर काय होईल? मुख्य अंकाचीही पुरवणी होईल. राणे करायला गेले "सामना" आणि समोर आला फुसका "प्रहार"! इतिहासाची पुनरावृत्ती होतेय, प्लॅटफॉर्म (माध्यम) फक्त बदलले. क्रांती करायची, प्रस्थापित चित्र बदलायचे तर जातिवंत चे गव्हेरा हवेत, इथे इकडून-तिकडून लाथाडलेल्या, नाकारलेल्या, मुख्य प्रवाहाबाहेर असलेल्या, हार्ड कोअर पत्रकारिता न केलेल्या गाळाचे गव्हारे (कळप) उभा राहिला आहे. दमदार एंट्रीला, चित्र बदलायला, चर्चेत यायला एक वागळे (दी ओरीजीनल) हवा होता. न पेक्षा किमान "आवाज महाराष्ट्राचा" तरी हवा होता. यातलं काहीच नसल्याने राजकारणातील "संजय"चाच आधार घेऊन सुरुवात करावी लागली. असं म्हणतात, "First Impression the Last Impression." ते दिसून आलं. "सामना"ची अपेक्षा धरण्यात अर्थ नाही, "प्रहार" होत जाणार.
जनतेचा आवाज वैगेरे अपेक्षा धरणे मूर्खपणा ठरणार, राजकारण्यांचाच आवाज घुमत जाणार. नवं काही नाही मिळणार, मळलेल्या पायवाटेवरूनच यांचाही प्रवास होत जाणार! साहेबांच्या काळातला पेपर समोर ठेवून त्याचे डिजिटल, सॅटेलाईट व्हर्जन आणले असते तरी सुपरहिट ठरले असते. आज बहुतांश तमाम सर्व मोदी-शिंदे भक्तांच्या मांदियाळीत दमदार सत्ताविरोधी आवाज जोरात घुमू शकला असता. अर्थात, प्रिंटमध्ये सत्ताधीशांच्या चरणी निष्ठा वाहिलेले कुणी प्लॅटफॉर्म बदलला म्हणून नव्या माध्यमात फार काही वेगळे करेल, अशी अपेक्षा धरणे म्हणजे शेखाचिल्ली स्वप्नरंजनच ठरेल. असो. नव्या प्लेअरला असलेला एक खूप मोठा व्हॅक्युम मिस होताना दिसतोय. तूर्तास तरी, न्यूज स्टेट, लोकशाहीला धोका नाही, अगदी जय महाराष्ट्रलाही नाहीच नाही !
----------
पुन्हा राजकारण्यांचाच आवाज !
कुणीच ठरणार नाही, जनतेचा आवाज
😓😥😰😭
गर्दीत पडली फक्त आणखी एकाची भर!
• राजकीय गोंधळात जनतेचा आवाज खरेच कोण ऐकवणार आहे का?
• रोजच्या बातम्यांमध्ये खरेच जनतेचे प्रश्न कोण मांडणार आहे का?
संजय राऊत जिंदाबाद, राजकारण जिंदाबाद!
• मुर्दाड व्यवस्थेत फक्त आणखी एक वाटेकरी सामील
मग ते,
जनतेचा प्रश्न, जनतेचा आवाज?
🤔❓
ते काय असते?
First Day First Show - फ्लॉप
👎🏻
Initial Ratings 0.5/5
0 टिप्पण्या