कुणी बक्षीस घेता का बक्षीस'? कोल्हापुरातील वृत्तपत्रात 'गिफ्ट वॉर'कोल्हापूर - कुणी बक्षीस घेता का बक्षीस अशी विचारण्याची वेळ कोल्हापुरातील आघाडीच्या दैनिकावर आली आहे. गिफ्टचे आमिष दाखवून अंक सुरु करण्याची गळ जाहिरातीद्वारे घातली जात आहे.  पुढारी , सकाळ आणि लोकमतने अंकाचे बुकिंग करणाऱ्या वाचकांसाठी विविध बक्षीस योजना आणल्या आहेत.

कोल्हापुरातील प्रमुख दैनिकात काही वर्षांपूर्वी 'प्राईज वॉर' रंगले होते. व्यावसायिक स्पर्धेतून सर्वच दैनिकांनी वृत्तपत्रांच्या किमती कमी केल्या होत्या तर कोल्हापुरात पुन्हा एकदा प्रमुख दैनिकात अंक वाढीसाठी गिफ्टवॉर रंगणार आहे. अंक बुकिंग करा आणि गिफ्ट मिळवा ही योजना कोल्हापुरात 'मानबिंदू'ने काही वर्षांपूर्वी आणली होती. मात्र बुकिंग करणाऱ्या वाचकांची फसवणूक करत दोन वर्षापासून या योजनेतील दुसरे बक्षीस मानबिंदूने दिले नव्हते. मात्र त्यांना आता स्पर्धक दैनिकांच्या बक्षीस योजना पाहून खडबडून जाग आली आहे.'करा नवी सुरुवात 199 रुपयात' या टॅग लाईनखाली 'सकाळ'ने दोन वर्षासाठी वाचक वर्गणीदार योजना सुरू केली आहे. या योजनेला प्रतिसाद मिळू लागताच त्याला शह  देणार नाहीत ते 'पद्मश्री' कसले 'दोन वर्षे पाहू नका वाट, पुढारीकडून बक्षिसांची लाट' या टॅगलाईनखाली 'पुढारी धमाका खास... दोन बक्षीसे हमखास' ही योजना आणली आहे. या दोन योजनामुळे खडबडून जागे झालेल्या 'मानबिंदू'ने खुशखबर... खुशखबर... खुशखबर... म्हणत लोकमत वाचक वर्गणीदार योजनेस मुदतवाढ देत 28 फेब्रुवारीपासून गिफ्ट वाटप सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील वाचकांवर बक्षिसांचा वर्षाव सुरू असून कोणत्या दैनिकाचे बुकिंग करावे, या संभ्रमात वाचक आहेत. या गिफ्टच्या वर्षावामुळे 'पत्रकारिता परमोधर्म' कोणत्या दिशेला चालला आहे, अशी चिंता सुज्ञ वाचकातून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments