मुंबई मराठी पत्रकार संघात "परिवर्तन"; अध्यक्षपदी संदीप चव्हाण

* तरुण तुर्क आणि ज्येष्ठ सदस्यांच्या पॅनेलचा अभूतपूर्व विजय मुंबई
मराठी पत्रकार संघात अखेर "परिवर्तन" झाले आहे. संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत, तरुण तुर्क आणि ज्येष्ठ सदस्यांच्या परिवर्तन पॅनेलचा अभूतपूर्व विजय झाला. संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि "बित्तंबातमी"चे संपादक संदीप चव्हाण यांची प्रचंड बहुमताने निवड झाली. 


मुंबई मराठी पत्रकार संघात यावेळी "शत प्रतिशत परिवर्तन" झाले. परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस आणि 9 सदस्य असे 14 पैकी 14 उमेदवार विजयी झाले. परिवर्तनने निवृत्त श्रमिक पत्रकार आणि आता "प्रहार"चे सुकृत खांडेकर यांच्या नेतृत्वातील समर्थ पॅनेलचा पराभव केला. यापूर्वी पत्रकार संघात विश्वस्त राहिलेले खांडेकर यांनी संकेत डावलून अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली, त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले गेले. तेव्हाच तरुण सदस्य मतदारांनी खांडेकरांना "रिटायर" करण्याचा इरादा जाहीर केला होता. 

अकारण निवडणुकीची हौस करून खांडेकरांनी स्वत:ची पुरती शोभा करून घेतली. त्यांना साथ देणारे ज्येष्ठ मंत्रालय पत्रकार उदय तानपाठक आणि सारंग दर्शने यांनाही मतदारांनी रिटायर करून धडा शिकवला. पूर्णवेळ श्रमिक पत्रकारितेत निवृत्तीचे निश्चित वय असते. त्यानंतर खरेतर व्यक्ती "असमर्थ" होत जातो. तरीही पत्रकार संघटनांवर रिटायर झालेली मंडळी, स्वतः "समर्थ" असल्याचा दावा करू पाहत होती, ही खुर्च्या उबवणारी प्रवृत्ती यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मतदारांनी साफ नाकारली. काका उर्फ कुमार कदम हे यावेळी परिवर्तन पॅनलच्या पाठीशी होते. त्यांची या विजयात निश्चितच अत्यंत मोलाची भूमिका राहिली. 


मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 2024-26 साठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आणि नूतन कार्यकारिणी अशी :

अध्यक्ष - संदीप चव्हाण, उपाध्यक्ष - स्वाती घोसाळकर आणि राजेंद्र हुंजे, कार्यवाह - शैलेंद्र शिर्के, कोषाध्यक्ष - जगदीश भोवड,  कार्यकारिणी सदस्य - राजीव कुळकर्णी, राजेश खाडे, किरीट गोरे, आत्माराम नाटेकर, अंशुमन पोयरेकर, देवेंद्र भोगले, दिवाकर शेजवलकर, गजानन सावंत, विनोद साळवी


पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवार असे : सुकृत खांडेकर, उदय तानपाठक, विष्णू सोनावणे, सारंग दर्शने, कल्पना राणे, श्यामसुंदर  सोन्नर, उमा कदम, रवींद्र भोजने, नंदकुमार पाटील, अरविंद सुर्वे, संतोष गायकवाड, विठ्ठल बेलवाडकर, राजेंद्र साळस्कर, महेंद्र जगताप, केतन खेडेकर


अध्यक्षपदी चव्हाण यांना 316 तर पराभूत झालेले खांडेकर यांना अवघी 160 मते मिळाली. उपाध्यक्षपदी घोसाळकर यांना 288 आणि हूंजे यांना 225 मते मिळाली. पराभूत उमेदवार तानपाठक यांना 208 आणि सोनावणे यांना 203 मते मिळाली. कार्यवाहपदी शिर्के हे तब्बल 200 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. कोषाध्यक्षपदी भोवड यांचा 210 मतांनी विजय झाला. त्यांना 336 तर दर्शने यांना अवघी 126 मते मिळाली. कार्यकारिणी सदस्य निवडीत "सामना"चे देवेंद्र भोगले यांना सर्वाधिक 282 मते मिळाली.विरोधी समर्थ पॅनेलमध्ये दिग्गज रिटायर पत्रकारांचा भरणा होता. मात्र, त्यातील एकही जण 200 मतांचा टप्पा गाठू शकला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या