'मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ' या नावाची सोनेरी टोळी



'मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ' या नावाचे एक अनधिकृत कडबोळे मंत्रालय आणि विधीमंडळात गेली कैक वर्षे 'अधिकृतपणे' वावरत आहे. 'अनधिकृत' अशासाठी की, राज्याच्या प्रशासकीय आणि कायदेमंडळाच्या शीर्षस्थानी वावरणाऱ्या या कथित वार्ताहर संघाची नोंदणी धर्मादाय आयुक्त किंवा तत्सम कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे झालेली नाही. 


या संघाची कोणतीही शासनमान्य घटना किंवा पोटनियम नाहीत. मात्र या संघाची मतदार यादी तयार होते, चक्क निवडणुका होतात. जुनी कार्यकारिणी जाते, नवीन सूत्रे घेते. मग मुख्यमंत्री नवीन कार्यकारिणीला 'वर्षा'वर निमंत्रित करतात, पदाधिका-यांचे सत्कार होतात. एवढेच काय, जेव्हा मुख्यमंत्री शपथविधीनंतर प्रथम मंत्रालयात येतात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेला वंदन केल्यावर सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात जाण्यापूर्वी या संघाला भेट देतात, तिथे वार्तालाप झाल्यावरच ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान होतात. गेली कित्येक वर्षे ही प्रथा बिनबोभाटपणे सुरु आहे.


या तथाकथित 'मंआविवासं' ला कोणतेही कायदेशीर किंवा वैधानिक अस्तित्व नाही, शासनदरबारी याची नोंदच नाही. असे असले तरी राज्य सरकारचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या संघाची उत्तम बडदास्त राखते. स्वतंत्र वातानुकूलित कार्यालय,सुसज्ज बैठक व्यवस्था, संगणक यंत्रणा, दिमतीला चतुर्थ वर्ग कर्मचारी, दूरध्वनी, झेरॉक्स मशीन, प्रिंटर, सर्व वृत्तपत्रे अशा सर्व सुविधा या अनधिकृत संघटनेसाठी अगदी अधिकृतपणे बहाल केल्या जातात. 



विधान भवनामध्येही या संघाने अगदी मोक्याच्या आणि प्रशस्त जागेवर असाच अनधिकृत कब्जा केला आहे. जिथे कायदे बनवले जातात, त्या पवित्र भवनातच हा असंवैधानिक प्रकार गेली कैक वर्षे बिनदिक्कत सुरु आहे.


माहिती विभागाचे कार्यालय तळमजल्यावर आहे. मंत्रालयाचे नूतनीकरण झाले तेव्हा माहिती विभागाच्या तंबुत शिरलेल्या 'मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ' नावाच्या या ऊंटाने चक्क माहिती विभागाची मोक्याची जागाच बळकावली. मूळातच या विभागाचा विस्तार वाढला, जागा कमी पडू लागली. असे असताना या संघाने या विभागाला हुसकावून लावत भल्यामोठ्या जागेवर कब्जा केला. 


माहिती संचालक, उपसंचालक, अन्य अधिकारी खुराड्याएवढे चेंबरमध्ये बसून काम पाहू लागले. काही अधिका-यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण थेट मुख्यमंत्र्यांकडे वशीला असलेल्या या संघाने मुख्यमंत्र्यांच्याच एका विभागावर वरकडी करीत कोणाची डाळ शिजू दिली नाही.

- उन्मेष गुजराथी 

स्प्राऊट्स Exclusive 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या