नवी मुंबई येथील होतकरू पत्रकार हर्षल भदाणे यांचे धुळे येथे एका हृदयद्रावक अपघातात अकाली निधन झाले. अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पत्रकारितेच्या विविध अंगांना आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या हर्षल यांचे अकाली जाणे हे पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी अपूरणीय हानी आहे.
धुळे येथील आपल्या मूळ गावी कामानिमित्त गेले असताना, एका मद्यधुंद ट्रक चालकाने हर्षल यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हर्षल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
हर्षल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात साम टीव्ही मध्ये अँकर म्हणून केली. त्यानंतर टीव्ही ९ आणि लोकशाही या वृत्त वाहिन्यांमध्ये रिपोर्टर म्हणून त्यांनी आपल्या कर्तबगारीची छाप सोडली. सध्या ते टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीमध्ये ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. पत्रकारितेच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले कौशल्य पणाला लावत अनेक आव्हानात्मक परिस्थितींचा यशस्वी सामना केला होता.
हर्षल हे आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मित्र परिवार आणि असंख्य शुभचिंतक असा मोठा परिवार आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर आयुष्याची नवी सुरुवात करणाऱ्या हर्षल यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हर्षल यांचे सहकारी त्यांना एक मृदुभाषी, प्रेमळ आणि कणखर पत्रकार म्हणून ओळखतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे योगदान फार मोलाचे आहे. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्राला मोठी हानी पोहोचली आहे.
हर्षल भदाणे यांच्या आत्म्यास शांती लाभो.
0 टिप्पण्या