धाराशिवमध्ये पत्रकारांच्या महायुद्धाची नवी लढाई: "नंगानाच ते फुकट पेग!"

 


धाराशिव हे शहर एकेकाळी मोजक्या पत्रकारांसाठी ओळखले जायचे. प्रिंट मीडियाचा जमाना होता, त्यामुळे शहरातले पत्रकार बोटांवर मोजता यायचे. मंत्री साहेबांचा दौरा असो किंवा मोठ्या अधिकाऱ्यांचे कार्यक्रम, माहिती कार्यालय एक-दोन जीप काढायचे, त्यात सारे पत्रकार बसून कार्यक्रम कव्हर करायचे. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की, दोन बस काढल्या तरी सर्व पत्रकार बसू शकणार नाहीत! पत्रकारांची संख्या इतकी वाढली आहे की, माहिती कार्यालयाने हळूहळू हात वर केले आहेत आणि पत्रकारांना कुठे नेताना मंत्रीच खर्च करायला लागलेत. काही पत्रकारांनी तर थेट मंत्र्यांचे खास 'चमचे' बनून स्वतःची व्यवस्था करून घेतली आहे, ती वेगळीच गोष्ट.


ही पत्रकारांची भरती आली टीव्ही आणि डिजिटल मीडियाच्या प्रसारामुळे. एकेकाळी धंद्याच्या नावावर 'अभ्यासू पत्रकार' होते, आता मात्र 'तथाकथित पत्रकार' हा शब्द रुढ झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दररोज सात-आठ जणांचे एक टोळके बसलेले असते. हे सर्वजण मोठ्या चॅनलचे पत्रकार नाहीत, उलट त्यांनी स्वतःचे यूट्यूब चॅनल काढलेले आहेत. चॅनलचे सब्सक्राइबर्स जेमतेम पाचशे ते हजार असतात, पण अभिमान लाखोंचा! यांचं काम कसं चालतं, तर कुणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले की, हे महाशय लगेच त्यांना गाठतात. “आम्ही अमुक-अमुक चॅनलचे पत्रकार आहोत, तुमची बातमी ब्रेकिंग करतो, फक्त इतके पैसे द्या,” असं सरळ सांगतात. मग मिळतील तेवढे पैसे उकळतात, आणि टोळक्यातील प्रत्येकाला दिवसाला कधी २००, कधी ५० रुपये मिळतात. जर दिवस चांगला गेला तर हे ५०० ते १००० रुपये कमावतात. म्हणजे बातमीपेक्षा पैसेच मोठे 'ब्रेकिंग न्यूज' असतात!


त्यातही 'कोटवाला' पत्रकारची कहाणी सगळ्यात वेगळी. हा पत्रकार नेहमीच कोट घालून फिरतो, आणि जिल्हाभर आपल्या स्वतःच्या कारमध्ये दौरे करतो. त्याच्या कव्हरिंगसाठी लागणारे डिझेल आणि भत्ता, सगळं मिळून किमान तीन हजार रुपये तो काढतो. बाकीचे पत्रकार निवांत बसून बातम्या कव्हर करत असताना हा कारने फिरत असतो, आणि बातम्यांच्या नावाखाली डिझेलचाच धंदा जोरात करतो.


काही दिवसांपूर्वी मात्र शहरात एक मोठा गोंधळ उडाला. तीन टीव्ही चॅनलच्या रिपोर्टरना एकाच वेळी काढून टाकण्यात आले. नाईन चॅनलच्या रिपोर्टरने एका बियर बारमध्ये बिअर पिऊन राजकीय नेत्याच्या सोबत राडा केला. फुकटच्या पेगवर पेग मारणाऱ्या या रिपोर्टरचा व्हिडीओ 'उघडा डोळे बघ नीट' चॅनलच्या रिपोर्टरने टिपला होता. अडाणी चॅनलच्या रिपोर्टरने तो व्हिडीओ चॅनल व्यवस्थापकाकडे पाठवला, आणि त्या बियरबार रिपोर्टरची तडकाफडकी हकालपट्टी झाली.


इथं घोटाळा इतक्यावर थांबला नाही. त्या बियरबार रिपोर्टरने उघडा डोळे बघ नीट आणि अडाणी चॅनलच्या रिपोर्टरचा नंगानाचाचा व्हिडीओ एका तमाशा बारीत टिपला होता. त्याने तो व्हिडीओ त्यांच्याच चॅनल व्यवस्थापकाकडे पाठवला, आणि मग दोघांचीही हकालपट्टी झाली! या तीन रिपोर्टरनी एकमेकांचा बळी घेऊन स्वतःला काढून टाकलं. 


आता या रिकाम्या जागांसाठी भरपूर अर्ज आले आहेत. नाईन चॅनल 'जय श्रीराम' म्हणत आहे, अडाणी चॅनलला "सक्षमताई"ने रिपोर्टरची जागा निश्चित केली आहे, तर उघडा डोळे बघ नीट चॅनलमध्ये पुन्हा कळंबकरांची नियुक्ती झाली आहे. कळंबकर आधीच न्यूज १८, साम, लोकशाही, झी २४ अशा अनेक चॅनल्समध्ये होते, आता 'उघडा डोळे'ही त्यांच्याच हातात आलंय.


या सर्व गोंधळात तुळजापूरकर मात्र हवालदिल आहेत. "आम्ही जिल्ह्यात फक्त माश्या मारायच्या का?" असा त्यांचा सवाल आहे, कारण या महायुद्धात त्यांना अजूनही 'ब्रेकिंग' मिळालेली नाही!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या