एबीपी माझा हे मराठी न्यूज चॅनल, 17 वर्षांपूर्वी आपल्या "उघडा डोळे, बघा नीट" या टॅगलाइनसह सुरु झालं आणि लवकरच मराठी मीडिया जगतात एक अग्रणी स्थान मिळवलं. या चॅनलने सलग 14 वर्षे टीआरपीमध्ये नंबर 1 चं स्थान कायम ठेवलं, जे कोणत्याही चॅनलसाठी एक मोठं यश होतं. परंतु, यश कायम ठेवणे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच कठीणही असतं. मागील तीन वर्षांत, एबीपी माझाला या यशाचा गड टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला. एकेकाळी टीआरपीमध्ये अव्वल असलेल्या या चॅनलची जागा आता कधी दुसऱ्या, तर कधी तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे संपादकीय नेतृत्व बदल. राजीव खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली एबीपी माझा यशाच्या शिखरावर होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेले उमेश कुमावत आणि निलेश खरे या पत्रकारांनी प्रतिस्पर्धी चॅनलमध्ये जाऊन उत्कृष्ट कामगिरी केली. कुमावत टीव्ही 9 मराठीचे संपादक झाले आणि या चॅनलने नंबर 1 ची जागा मिळवली. त्याचप्रमाणे, निलेश खरे साम चॅनलमध्ये गेले आणि त्यांच्यामुळे सामनेही चांगले काम केले.साम सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.
नेतृत्वातील बदलाच्या विचाराने, एबीपी माझाने वर्षभरापूर्वी एक धाडसी पाऊल उचलले. नागपूर ब्युरो प्रमुख असलेल्या सरिता कौशिक यांना चॅनलची संपादक बनवण्यात आलं. राजीव खांडेकर यांची बदली दिल्लीतील समूह संपादकपदी करण्यात आली. मात्र, खांडेकर दिल्लीला न जाता मुंबईतच राहून चॅनलच्या कामकाजात ढवळाढवळ करत होते, त्यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली. अखेरीस, चॅनलने सर्व सूत्रं सरिता कौशिक यांच्याकडे दिली आणि खांडेकर समर्थक असलेल्या राहुल खिचडी, डॉ. कविता राणे, ज्ञानदा कदम यांच्यासह जवळपास २५ हून अधिक कर्मचार्यांनी चॅनल सोडण्याचा निर्णय घेतला.
जरी हा काळ एबीपी माझासाठी आव्हानात्मक होता, तरी सरिता कौशिक यांनी आपल्या ताकदीने आणि दृढनिश्चयाने चॅनलला पुन्हा स्थिरावलं. त्यांचा "झिरोअवर" हा शो सध्या विशेष चर्चेत आहे आणि टीआरपी रेटिंगमध्ये चॅनल पुन्हा दोनवर आणि कधी तीनवर आहे.. या संघर्षाच्या काळातही त्यांनी चॅनलच्या गुणवत्तेत कुठलीही तडजोड केली नाही. त्यांच्या मेहनतीने आणि दूरदृष्टीने चॅनलला नवीन उंचीवर नेलं आहे.
झिरो अवर - सखोल विश्लेषणाचा आवाका
झिरो अवर हा एबीपी माझा वरील संपादक सरिता कौशिक यांच्या नेतृत्वाखालील एक सखोल विश्लेषणात्मक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांवर तज्ञांचा सहभाग घेऊन त्याचे सविस्तर विश्लेषण केले जाते. प्रत्येक घडामोडीच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करून त्याचा समाज, अर्थव्यवस्था, राजकारण, आणि सामान्य लोकांवर होणारा परिणाम समजावून सांगितला जातो.
सरिता कौशिक यांच्या दीर्घ पत्रकारितेचा अनुभव आणि त्यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांची टीम हा या कार्यक्रमाचा प्रमुख आधार आहे. कौशिक यांनी आठ जणांची अनुभवी टीम तयार केली आहे, जी दररोजच्या प्रमुख बातम्यांवर लक्ष ठेवून त्यांचे विश्लेषण तयार करते. त्यामुळे प्रेक्षकांना फक्त बातमी मिळत नाही, तर त्यासोबत बातमीचे विस्तृत, सर्वसमावेशक आणि परिणामकारक विश्लेषणही मिळते.
या शोची शैली संयमित, सखोल आणि गंभीर असल्यामुळे ज्या प्रेक्षकांना बातम्यांचे विस्तृत विश्लेषण अपेक्षित असते, त्यांच्यासाठी *झिरो अवर* हा परिपूर्ण कार्यक्रम ठरतो. प्रेक्षकांना फक्त माहिती देण्यावर भर न देता, त्या माहितीचा विचार आणि त्या विचाराचा विविध अंगांनी मागोवा घेणे या शोचे वैशिष्ट्य आहे.
-बेरक्या उर्फ नारद
0 टिप्पण्या