उद्योगपती गौतम अदानी यांनी भव्यतेचा संकल्प करून हिंदीतील एनडी टीव्ही घेतल्यावर प्रादेशिक भाषांमध्ये विस्ताराचा डंका पिटला. मग काय, मे २०२४ मध्ये "एनडी टीव्ही मराठी" चॅनल धुमधडाक्यात मुंबईत सुरू झालं. अभिनेता रितेश देशमुख यांनी चॅनलची जाहिरात करताच सोशल मीडियावर 'झोपलेल्याला उठवा, उठलेल्याला धक्का द्या' अशा हावभावांनी वातावरण तयार केलं. पण म्हणतात ना, 'हवा जोरात पण पंखा बंद', तसंच काहीसं इथं झालं.
सहा महिने झालेत, पण चॅनलची "भव्यता" अद्याप तरी कुठे लपून बसली आहे हे कोणालाच कळलेलं नाही. कोल्हापुरी 'खिचडी'चा गंध सर्वत्र पसरला, पण कुकरच्या शिट्या मात्र अजून वाजल्या नाहीत. स्टुडिओमध्ये टीम तयार आहे, ५० पेक्षा अधिक जण जमले आहेत, पण "शिजतंय का?" असं विचारायचं धाडस कोणालाच होत नाही.
कोकणातल्या राणे बाईंचा जोश असाच मावळतोय, एखाद्या कोकण किनाऱ्यावर सुर्यास्तासारखा. साम टीव्हीची टीम इथं हजेरी लावून तलावात 'माणिक' मोती शोधण्याच्या तयारीत होती, पण तलाव इतका कोरडा की कळसुबाईच्या डोंगरावर तलाव निर्माण करणे सोपं वाटावं!
आता या सगळ्यात धाराशीवचा ‘कुकर्मी’ देखील जॉईन झाला पण उलट चॅनलला आणखी ग्रहण लागलं ! बार्कमध्ये नोंदणी तर अजून केलीच नाहीये, म्हणजे टीआरपीचं गणित अजून अवलंबून आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात ना, तीच स्थिती झालीय. आता मूठ उघडली तर माणिक-मोती बाहेर पडतील का, की कोळसा सापडेल, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.तर, ‘झाकली मूठ उघडल्याशिवाय’ अदानींच्या चॅनलचं भविष्य काय होणार हे पाहणं आता प्रेक्षकांच्या हातात!
0 टिप्पण्या