अंबाबाईच्या आशीर्वादाने सुरू झालेलं चॅनल आणि टीआरपीवर 'तुळशीपत्र'!

 


कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन मुंबईत एक नवीन न्यूज चॅनल सुरू झालं. अंबाबाईचा आशीर्वाद, पंचगंगा नदीच्या पाण्याचं पावित्र्य, आणि मुंबईसारख्या महानगरात वाहणारा धडाकेबाज उत्साह—अशी सगळी बॅकग्राऊंड असतानाही चॅनलची सुरुवात मात्र थोडी 'पंचगंगा गाळासारखी'च झाली. चॅनल सुरू होऊन वर्षभर झालं, पण टीआरपीचं गणित अजूनच गडबडलं. कुठल्या यादीत? तर खालून पहिल्या क्रमांकावर, म्हणजे चक्क शेवटचा ९वा क्रमांक.


चॅनलच्या टीआरपीबाबत चर्चा सोडाच, पण कोणती बातमी लोकांच्या चहापानाच्या चर्चेतसुद्धा दिसत नाही. 'प्रसन्न' नाव असलं तरी चेहऱ्यावरची निराशा लपत नाही. आता असा आंबट चेहरा दाखवून काहीही प्रसन्न होणार नाही हे उघड आहे. कणखर नेतृत्व असलं, तरच बातम्यांची हवा असते. मात्र येथे 'नम्रते'ने सारे काही सांभाळता येत नाही, वागळेसारखा कणखरपणा दाखवायला हवा, तरच चॅनल उभं राहील.


मालकांच्या डोक्यात आता मोठी चिंतेची जळमटं गोळा झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवीन चेहऱ्यांचा शोध सुरू आहे. पण काय करणार? जो शोध घ्यायला जातोय, त्यात सापडतात तेच जुनाट चेहरे! चॅनलमध्ये आलेल्या मंडळींनी काहीतरी भव्यदिव्य करावं अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे पंचगंगा नदीचा गाळ हटवून पाणी गोड होईल, अशी आशा ठेवण्यासारखं आहे.


पेपर छापून कमावलेला पैसा आता या चॅनलमध्ये गमावण्याची वेळ आली आहे. रोजच्या रोज नुकसान वाढतंय आणि प्रत्येक दिवशी टीआरपीचं शेवटचं स्थान पक्कं करतंय. आता ही अवस्था पाहून मालकाच्या मनात चॅनलवर  तुळशीपत्र ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटतंय. 'हे काय सुरू आहे' असं विचारणाऱ्या मालकाचं धैर्य आता संपतंय, कारण चॅनलचा 'रोडमॅप' अजूनही धूसर आहे.


शेवटी, विधानसभा निवडणूक झाली की चॅनलवर "तुळशीपत्र"  ठेवलं जाईल, असं गुपचूप बोललं जातंय. सगळीकडे चाललेली ही चर्चा पाहून असं वाटतंय की, आता निवडणुका संपताच मालकांनी  सगळं गुंडाळून पंचगंगा नदीच्या गाळासारखं हे चॅनल बंद करावं आणि त्या पैशातून काहीतरी नवीन सुरू करावं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या