मुंबई: सकाळ माध्यम समूहाचे सरकारनामा हे साप्ताहिक ७ सप्टेंबरपासून वाचकांच्या भेटीला येत आहे. या साप्ताहिकाचे अधिकृत प्रकाशन आज मुंबईतील साम स्टुडिओमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सकाळचे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले आणि सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षांपासून डिजिटल माध्यमाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचलेली सरकारनामा वेबसाइट आता प्रिंटमध्ये देखील येत आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे साप्ताहिक सुरू होत असल्याने राजकीय वर्तुळात या प्रिंट अंकाबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
दर शनिवारी प्रकाशित होणारे हे २४ पानांचे टॅब्लॉइड आकाराचे साप्ताहिक राजकीय घडामोडी, मुलाखती आणि सखोल विश्लेषणांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. राजकीय पक्षांची रणनीती, उमेदवारांच्या कामगिरीचे विश्लेषण आणि मतदारांच्या भावना यावर आधारीत लेखन वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून *सरकारनामा* साप्ताहिक सुरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साप्ताहिकाच्या प्रकाशन प्रसंगी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी डिजिटल युग असूनही प्रिंट माध्यमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की, "प्रिंटमध्ये अंक वाचल्याशिवाय समाधान होत नाही."
राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण देण्याचे उद्दिष्ट असलेले सरकारनामा वाचकांच्या उत्सुकतेला योग्य न्याय देईल, अशी अपेक्षा आहे.
0 टिप्पण्या