सोलापूर - सोलापूर श्रमिक पत्रकार संघात तब्बल ११ वर्षे अध्यक्षपद सांभाळणारे विक्रम खेलबुडे यांची अखेर अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जुने सदस्यांनी त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर संघातील सर्व जुन्या सदस्यांनी एकत्र येत आज विक्रम खेलबुडे यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्या जागी कृष्णकांत चव्हाण यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सचिवपद संजय पवार यांनी स्वीकारले आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे एकूण १६८ सदस्य आहेत. विक्रम खेलबुडे यांच्यावर संघाच्या सदस्यांची फसवणूक करून बोगस सदस्यांची नोंदणी केल्याचे आरोप होत होते, ज्यामुळे त्यांनी आपले अध्यक्षपद कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. संघाची निवडणूक दरवर्षी नियमानुसार घेतली जाते, मात्र विक्रम खेलबुडे हे गेल्या ११ वर्षांपासून पदावर कायम होते, इतर सर्व कार्यकारिणी निवडली जात होती, मात्र विक्रम खेलबुडे आपल्या पदाला चिकटून बसले होते.
विक्रम खेलबुडे यांनी संघातील सदस्यांना इन्शुरन्स आणि गृहनिर्माण संस्थेचे प्रलोभन दाखवून आपले पद टिकवले होते. मात्र, अनेक सदस्यांनी त्यांच्या या पद्धतीला विरोध दर्शविला होता. अखेर त्यांच्या या कार्यपद्धतीला आळा घालत संघाने त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे आणि नव्या नेतृत्वाने संघाचे सूत्र हाती घेतले आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची निवडणूक येत्या ८ तारखेला होणार होती. त्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वीच जुन्या सदस्यांनी एकत्र येत विक्रम खेलबुडे यांची हकालपट्टी करत सूत्रे हाती घेतली आहेत.
0 टिप्पण्या