२००८ साल. मुंबईत मोठा गाजावाजा करून ‘चला जग जिंकू या’ असं म्हणत 'आयबीएन लोकमत' चॅनलची सुरुवात झाली. त्या वेळेस मराठी मीडियाच्या विश्वात हा चॅनल म्हणजे एक नवा उगवणारा तारा होता. चॅनलचं नेतृत्व पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तींकडे होतं. सोबत मंदार फणसे, सुभाष शिर्के यांसारखी तगडी टीम होती. वागळेंच्या नेतृत्त्वाखालील ही टीम म्हणजे एक स्फोटक मिश्रण होतं, ज्यात पत्रकारितेचा अंगार आणि विचारसरणीचा उंची होती . पण या सर्वांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सुरू झालेलं चॅनल टीआरपीच्या गणितात मात्र कधीच पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर आलं नाही.
सहा-सात वर्षे झाल्यावर ‘अर्थ’शास्त्रात क्रांती घडवणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या हाती चॅनलचा ताबा आला. मग काय, वागळेंच्या डाव्या विचारसरणीला तिथं काही जागा उरली नाही. चॅनल आता उद्योगाच्या पंखाखाली आलं होतं, विचारसरणीच्या पंखाखाली नव्हे. म्हणूनच निखिल वागळे आणि सुभाष शिर्केसारखे तडफदार पत्रकार बाहेर पडले. “चलो भाई, जग जिंकणे की जगह घरही संभाल लेते हैं” म्हणत त्यांनी इथं विराम घेतला.
नंतर काय, टीआरपी वाढवण्याच्या मोहिमेत दर दोन वर्षांनी संपादक बदले जात राहिले. नवीन माणसं येत होती, जुनं काहीतरी बदलण्याच्या आशेने. पण चॅनलची गाडी टीआरपीच्या रुळांवर मात्र नीट फिरत नव्हती. त्यामुळे नाव बदलून ‘न्यूज १८ लोकमत’ केलं. “चला जग जिंकू या”ची घोषणा शांत होऊन काहीतरी नवीन टॅगलाईन घेतली गेली, पण आता फक्त नाव बदलून भागणार होतं का? गणित काहीच बदललं नाही.
महाराष्ट्रात मराठी चॅनलांची संख्या आता नऊ झाली आहे. टीआरपीच्या यादीत आता न्यूज १८ लोकमत पाचव्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे. हे असं फेकलं गेलंय की पाचव्या क्रमांकावर साडेचार वर्षांनंतर पुन्हा "पाटीलकी" खालसा करावी लागली. पुन्हा एकदा फणसाचा दरवळ चॅनलच्या आत सुरू झाला, आणि फणसाच्या फोडीसारखे संपादक बदलण्याचे कार्यक्रम लावले गेले.
चॅनलमध्ये पैसे कमी नाहीत; लक्ष्मी प्रसन्न आहेच. अगदी सोन्याच्या खुर्च्या मांडून संपादकांचे कार्यक्रम केले जातात. पण सरस्वतीचं गुप्त घर सोडून काहीच गती नाही. सरस्वती अजूनही टीआरपीच्या शर्यतीत रुसलेली आहे. लक्ष्मीच्या भरभराटीत सरस्वतीकडं दुर्लक्ष करणं चॅनलला महागात पडतंय. टीआरपीला काही नवीन विचारसरणीची जोड लागली नाही तर ही गाडी अशीच फणसाच्या वासाने दरवळत राहील, पण टीआरपीच्या यादीत मात्र मागच्या बाकावरच बसलेली दिसेल.
संपादकांची वरात, टीममध्ये नव्याने फणसाचा दरवळ, आणि लक्ष्मीचा प्रसन्न आशीर्वाद असतानाही, न्यूज १८ लोकमतला अजूनही टीआरपीच्या स्वप्नातले दिवस आलेले नाहीत. आता वाट पाहायची ती सरस्वतीच्या कृपेची, कदाचित त्याच दिवशी हे चॅनल जग जिंकण्याच्या आशेने पुढे येईल!
0 टिप्पण्या