स्ट्रिंजर रिपोर्टरचं 'पाकीट पर्व' सुरू - सुगीचे दिवस उजाडले !

 


मुंबई - महाराष्ट्रात न्यूज चॅनलच्या आकाशात तारांगण चमकतंय, आणि टीव्ही ९ मराठी, साम मराठी, एबीपी माझा हे मोठं मोठं चॅनल्स नंबर १ साठी एकमेकांचे मॅकअप काढतायत. झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत यांना तिसरा नंबर मिळवण्यासाठी इतकी धावपळ करावी लागतेय की ते अगदी फुफ्फुसं हातात धरतील की काय अशी परिस्थिती!


हे सगळं बघून चॅनलवरच्या अँकर, संपादक आणि इनपुट-आऊटपुट हेड मंडळीचं चॅनल बदलणं म्हणजे एखाद्या पक्षाचं मत बदलणं इतकं सोपं झालंय. पगार वाढला नाही की, लगेच दुसऱ्या चॅनलवर “30% अधिक” पगार घेऊन उडी मारतात! प्रमोशन मिळालं की आनंदाच्या उकळ्या फुटतात, पण हो, 'मास्टरशेफ' प्रमोशन नाही हं, न्यूज प्रमोशन!


आता हे सगळं बघून जिल्हा पातळीवर काम करणारे स्ट्रिंजर रिपोर्टर मात्र थोडं विचारात पडतात. प्रमोशन तर दूरची गोष्ट, पगाराचीही कसलीही हमी नाही. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत बातम्यांचा 'जगन्नाथ' ओढत बसतात, पण हातात किती पडतं तर 'मॅजिक' आकडा—दहा हजारच्याही आत!


पण काय सांगावं, डेस्कवर बसलेले महाभाग मात्र या स्ट्रिंजरांना 'पाकीट'वाले समजतात. त्यांना वाटतं की, "हे स्ट्रिंजर तर पेपराच्या पाकिटांत वरकमाई करून राहतात!" अहो, पण हे पाकीट चॅनलच्या इनपुट हेडकडूनच काढून घेतलं जात ! हे त्यांना कुठे माहित? महिन्याचं पाकीट वेळेवर नाही मिळालं तर रिपोर्टरची तंगडी धरून त्यांचं चॅनेल जिवंत ठेवतात!


आता या बिचाऱ्या स्ट्रिंजरांना मात्र कळत नाही, "संपादकांना राजकीय नेत्यांकडून पार्ट्या झोडायचं शौक, आणि आम्हाला पाकिटांचं ओझं!" निवडणुका जवळ आल्या की मात्र स्ट्रिंजरांच्या तोंडावर हसू खुलतं—नव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे ना! आता स्ट्रिंजर रिपोर्टरचं 'सोनं सोनं' होणार! सुगीचे दिवस सुरू! चॅनलवाले कसं म्हणतात ना, "ब्रेकिंग न्यूज असो वा पाकिटिंग न्यूज, स्ट्रिंजरचं भविष्य आता चकाचक!"


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या