मराठी वृत्तवाहिन्या - अनुभवी चेहऱ्यांचे वर्चस्व आणि नव्या पिढीची उणीव

 


महाराष्ट्रातील मराठी न्यूज चॅनल्सच्या क्षेत्रात काही महत्त्वाच्या बाबी आणि प्रश्न सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्रात एकूण ९ मराठी न्यूज चॅनल्स आहेत: टीव्ही ९ मराठी, साम मराठी, एबीपी माझा, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, लोकशाही मराठी, एनडी टीव्ही मराठी, पुढारी न्यूज, आणि जय महाराष्ट्र. 

या चॅनल्सचे संपादक म्हणजे त्यांच्या दिशा ठरवणारे महत्त्वाचे चेहरे आहेत, आणि ते सध्या कोण आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.

टीव्ही ९ मराठीचे संपादक उमेश कुमावत आहेत, तर साम मराठीचे संपादक निलेश खरे आहेत. एबीपी माझाचे संपादक म्हणून सरिता कौशिक कार्यरत आहेत. झी २४ तासचे कमलेश सुतार हे संपादक आहेत, तर न्यूज १८ लोकमतचे नवीन संपादक मंदार फणसे आहेत, ज्यांची ही तिसरी इनिंग आहे. पुढारी न्यूजचे तुळशीदास भोईटे हे संपादक आहेत, तर जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे आहेत. लोकशाही मराठीचे संपादक सध्या नाहीत; चॅनलचे  मालक  नायडू हेच संपादक म्हणून काम करत आहेत. एनडी टीव्ही मराठीमध्ये संपादक नाही, पण विनोद तळेकर, राहुल खिचडी, आणि माणिक मुंडे यांनी हे काम पाहत आहेत .

महाराष्ट्रातील मराठी वृत्तवाहिन्यांची संख्या वाढत असली, तरी त्यांच्या संपादकीय फळीत नव्या चेहऱ्यांची उणीव एक चिंतेचा विषय बनत चालली आहे. सध्या कार्यरत असलेल्या बहुतांश वाहिन्यांमध्ये संपादक म्हणून अनुभवी पत्रकारांचीच वर्णी लागत आहे. यातील अनेक जण तर एका वाहिनीतून दुसऱ्या वाहिनीत ठराविक कालावधीनंतर स्थलांतर करताना दिसतात. यामागे वाहिनीच्या कामगिरीत अपेक्षित सुधारणा न झाल्यास संपादकाची हकालपट्टी होणे आणि नंतर त्यांनाच दुसऱ्या वाहिनीत संधी मिळणे, असे प्रकार घडत असल्याचे दिसून येते. यामुळे संपादकीय धोरणांमध्ये सातत्य राखणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे कठीण होऊ शकते. 


या क्षेत्रात एक गोष्ट लक्षात येते की, अनेक संपादक एका चॅनलमधून दुसऱ्या चॅनलमध्ये स्थानांतरित होतात. ही स्थिती विशेषत: तीन ते चार वर्षांच्या कालावधीत घडते. कधी कधी त्यांच्या कामातील अपयशामुळे त्यांना काढून टाकले जाते, आणि पुन्हा दुसऱ्या चॅनलमध्ये त्यांची नियुक्ती होते. हे एक मोठे कोडे आहे की, का नवीन संपादकांची फळी तयार होत नाही. अशा परिस्थितीत तोच तोच चेहरा वेगवेगळ्या चॅनल्समध्ये दिसतो, जे सामान्य प्रेक्षकांसाठीही विचार करायला लावणारे आहे.

न्यूज १८ लोकमतचे नवे संपादक मंदार फणसे यांची ही तिसरी इनिंग आहे, यावरून ही बाब अधोरेखित होते. नव्या संपादकांची फळी तयार का होत नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

ही आहेत करणे ... 

चॅनलचे संपादक नियुक्त करताना, बड्या राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होत आहे. मालक त्यांच्या शिफारसीनुसार संपादक घेत असल्याचे अनेकवेळा घडले आहे. त्यामुळे नवीन संपादक तयार होत नाहीत, हे प्रमुख कारण मानले जात आहे. त्यामुळे तेच ते चेहरे इकडून - तिकडे जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. 

पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला पुरेसे प्रशिक्षण आणि संधी मिळत नसल्याचे एक कारण असू शकते. पत्रकारितेच्या शिक्षणात सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक कौशल्यांनाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच, वृत्तवाहिन्यांनी नव्या पत्रकारांना इंटर्नशिप आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे अनुभव मिळवण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. 


अनुभवी पत्रकारांना मिळणारे मानधन आणि सुविधा यांच्या तुलनेत नव्या पिढीला कमी मोबदला दिला जात असल्याने ते या क्षेत्राकडे आकर्षित होत नसावेत.यामुळे प्रतिभावान तरुण पत्रकार इतर क्षेत्रांकडे वळू शकतात. 


काही वेळा, वृत्तवाहिन्यांचे मालक किंवा व्यवस्थापन मंडळ विशिष्ट विचारधारेच्या किंवा राजकीय पक्षांशी संलग्न असलेल्या अनुभवी पत्रकारांना प्राधान्य देऊ शकतात ,यामुळे नव्या आणि स्वतंत्र विचारांच्या पत्रकारांना संधी मिळणे कठीण होऊ शकते.


या क्षेत्रातील स्पर्धा आणि कामकाजाचा ताण यामुळे नव्या पिढीतील पत्रकारांना या क्षेत्रात टिकून राहणे कठीण होऊ शकते .वृत्तवाहिन्यांनी पत्रकारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे आणि त्यांना योग्य वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.


या परिस्थितीत बदल होण्यासाठी वृत्तवाहिन्यांनी नव्या पिढीतील पत्रकारांना प्रोत्साहन देणे, त्यांना योग्य प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच, या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीनेही स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवून आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. पत्रकारितेच्या शिक्षणातही सुधारणा करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यावर भर दिला गेला पाहिजे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या