नांदेड – गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीसांनी भक्तांना लाठीचार्जच्या रूपात ‘लाथ-प्रसाद’ दिला आणि वातावरण चिखळलं! मंगळवारी रात्री गणेश भक्तांवर अचानक लाठीचा ‘आशीर्वाद’ कोसळला. रात्री साडेनऊ वाजता पोलिसांना अचानक मिरवणूक ‘आटपायची’ आठवण झाली आणि त्यांनी भक्तांच्या पायाखाली गोड लाठीचा दणका दिला. हे सर्व पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून घडल्याचं ऐकिवात आहे.
वातावरण जरा गार पडायला पाहिजे होतं, पण इथे तर पोलिसांनी चांगलाच ‘उकळा’ आणला! मात्र, या घटनेची बातमी ‘उघडा डोळे बघा नीट’ या एकमेव टीव्ही चॅनलनेच दाखवली. बाकीचे चॅनेल अंधळ्यांच्या शर्यतीत सहभागी झाले असावेत. अर्थात, कारणही तसंच होतं – गुन्हे शाखेकडून येणारी ‘मासिक दक्षिणा’ त्यांना निद्रावस्थेत ठेवण्यासाठी पुरेशी आहे. ते बिचारे जागे तरी कसे राहणार?
बातमीचे महाकाव्य इथेच संपत नाही. निवडणुकीचा सुगंध दरवळताच शहरात पावसात छत्र्या उगवाव्यात तशी युट्युब चॅनल्स उगवली आहेत. पण ‘लाथ-प्रसाद’चा रिपोर्ट त्यांनीही दाखवण्याचं धाडस केलं नाही. धाडसच नाही म्हणा, केवळ 'स्मार्टफोनवाले पत्रकार' दिसत होते; बातमी त्यांच्या स्क्रीनवर आली नाही बहुतेक!
प्रिंटवाल्यांची तर कायच कथा! स्थानिक प्रजावानी आणि महाराष्ट्राचा मानबिंदू सोडल्यास इतर कोणतंही वृत्तपत्र बातमी छापायला धजावलं नाही. पूर्वी वृत्तपत्र छापून पैसा कमवत होते, आता मात्र पैसे कमवून वृत्तपत्र छापतात, त्यामुळे असं घडणं काही नवीन नाही.
तर मंडळी, इथं कुणीही दोषी नाही, सगळेच निर्दोष! मग लाथा खाणं असो किंवा बातमी लपवणं – सगळे आपआपल्या ‘धंद्यात’ यथार्थपणे व्यस्त!
0 टिप्पण्या