टीव्ही मीडिया हा अत्यंत स्पर्धात्मक आणि गतिमान क्षेत्र आहे, जिथे प्रत्येक क्षणाला बदल होत असतात. या विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणे म्हणजे मोठी कामगिरीच. पण, निलेश खरे यांनी हे काम अतिशय यशस्वीपणे केले आहे. मागील १७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी टीव्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवा मापदंड तयार केला आहे.
खरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एबीपी माझामध्ये एक रिपोर्टर म्हणून केली. पुढे जय महाराष्ट्र या चॅनलमध्ये संपादक पदावर पदार्पण करून त्यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याचा ठसा उमटवला. पण त्यांची खरी क्षमता साम मराठीमध्ये उलगडली, जिथे ते पहिल्यांदा आले आणि हे चॅनल टीआरपीच्या क्रमवारीत कधी पहिल्या, तर कधी दुसऱ्या स्थानावर पोहोचले. त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात साम मराठीने आपली एक ठोस ओळख निर्माण केली.
यानंतर खरे यांनी झी २४ तास मध्ये प्रवेश केला, आणि तिथेही टीआरपीचा खेळ सुरू झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली झी २४ तास चॅनल कधी पहिल्या, तर कधी दुसऱ्या स्थानावर राहिले. तीन वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर खरे पुन्हा साम मराठीमध्ये परतले. त्यांची पुनरागमनाची ही इनिंगही तितकीच यशस्वी ठरली. जेव्हा खरे साम सोडून गेले, तेव्हा चॅनल टीआरपीच्या यादीत पाचव्या स्थानावर फेकले गेले होते. पण खरे यांच्या परत येताच चॅनल पुन्हा दुसऱ्या स्थानावर आले.
मीडिया क्षेत्रात खरे यांची ओळख आता "टीआरपीचा जादूगार" म्हणून केली जाते. जिकडे खरे तिकडे टीआरपी, असे समीकरण तयार झाले आहे. अनेक जण विचारात पडले आहेत की हे कस शक्य आहे? खरे यांची ‘जादूची कांडी’ नेमकी काय आहे?
यामागचे रहस्य म्हणजे खरे यांना टीव्ही माध्यमांची सखोल समज आहे. त्यांनी टीआरपीचे गणित उत्तमरीत्या समजून घेतले आहे. कोणत्या गोष्टींनी प्रेक्षकांना आकर्षित करता येते, त्यांचे लक्ष कसे कायम ठेवता येईल, हे त्यांना नक्की कळते. त्यामुळे त्यांची टीव्ही क्षेत्रात कायमच मागणी आहे.
निलेश खरे यांच्या कार्यकौशल्याची आणि टीआरपीवरची पकड खरोखरच अभूतपूर्व आहे. त्यांचा यशस्वी प्रवास इतरांना प्रेरणा देणारा आहे, आणि माध्यम क्षेत्रात त्यांनी उभारलेला ठसा त्यांच्या कारकिर्दीचा अमिट भाग राहणार आहे.
- बेरक्या उर्फ नारद
0 टिप्पण्या