नांदेड – काही दिवसांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तांना 'लाथ-प्रसाद' वाटून पोलीस महाशयांनी आपली ‘सेवा’ किती तत्पर आहे हे दाखवून दिलं होतं. आता त्याच पोलिसांनी नवीन ‘ऑफर’ सुरु केली आहे. मराठा आंदोलकांना यावेळी ‘लाठी प्रसाद’ मिळालाय. या प्रसंगावरून असं दिसतंय की, पोलिसांचं प्रसाद वितरण कार्यक्रम खूपच लोकप्रिय झालाय, मग तो भक्त असो की आंदोलक.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवली सराटीमध्ये सुरू असलेले आमरण उपोषण सरकारने अजूनही लक्षात घेतलेलं नाही. त्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले. काही मराठा कार्यकर्ते ‘दुकानं बंद करा’ असं सांगत फिरत होते. तेवढ्यात पोलिसांनी आपली गुप्त आणि ‘गुणकारी’ सेवा पुन्हा दाखवली आणि आंदोलकांच्या पाठीत 'लाठी प्रसाद' देत त्यांची पाठ थोडी मोकळी केली.
आता या साऱ्या घडामोडींचे व्हिडीओ काही उत्साही टीव्ही पत्रकारांकडे होतेच. पण नेहमीप्रमाणे पत्रकारितेत 'मामा' म्हणून प्रसिद्ध असलेला आणि पोलीस विभागाचा विश्वासू 'अब तक' पत्रकाराने पोलीस मित्रांची सुपारी घेतली आणि सगळे व्हिडीओ सफाचट गायब केले! हे ऐकूनच समजलं की, पत्रकारिता आणि पोलिसांची दोस्ती किती मजबूत आहे.
गणेश विसर्जनात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जने आधीच भक्तांना चांगलाच त्रास दिला होता, त्यामुळे या वेळेस नवीन काही गोंधळ नको म्हणून मामाच्या मार्फत पोलिसांनी आपली बाजू सावरली. मात्र मराठा आंदोलक या लाठीचार्जने अजूनही खूपच भडकलेले दिसत आहेत.
0 टिप्पण्या