अवयवदानाचा स्तुत्य निर्णय
पुण्यातील 'पोलिसनामा' या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवारी, दिनांक १ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. पावणेदोन महिन्यांपूर्वी झालेल्या गंभीर अपघातानंतर ते निगडीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. मृत्यूवर मात करतील, अशी आशा असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या दुःखद प्रसंगानंतर, प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. यामुळे प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच त्यांचे हृदय एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आले. प्रसाद यांनी मृत्युशी केलेली झुंज अपयशी ठरली असली तरी त्यांचे हृदय आजही दुसऱ्याच्या शरीरात धडकत आहे. हृदयाबरोबरच त्यांची दोन्ही फुफ्फुसे, यकृत, एक मूत्रपिंड आणि दोन्ही डोळेही दान करण्यात आले आहेत. यामुळे एकूण पाच रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे.
प्रसाद गोसावी यांच्या दुचाकीला पावणेदोन महिन्यांपूर्वी कार्यालयातून घरी परतत असताना खडकी रेल्वे स्थानकाजवळ गंभीर अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या मेंदूला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान, पायातील संवेदना पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय काढून टाकण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची शुद्ध हरपली. अखेर डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले.
प्रसाद यांचे हृदय पुण्यातील सैनिकी रुग्णालयात नेण्यासाठी पिंपरी ते पुणे दरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. पोलीस आणि लष्करी जवानांच्या संरक्षणात त्यांचे हृदय पुण्याकडे रवाना करण्यात आले. यावेळी डी.वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अवयवदानानंतर त्यांचा पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि निगडीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रसाद गोसावी आज ह्या जगात नसले तरी त्यांचे हृदय दुसऱ्याच्या शरीरात धडकत आहे, त्यांचे डोळे दुसऱ्याला जग पाहण्याची संधी देणार आहेत आणि त्यांच्या इतर अवयवांमुळे अनेक जणांना नवे जीवन मिळाले आहे. मृत्यूनंतर अवयवदान करणारे ते पहिले पत्रकार म्हणून कायम स्मरणात राहतील.
0 टिप्पण्या