कोल्हापूरातील पत्रकारांचे खंडणी प्रकरण : प्लास्टिक व्यापाऱ्याचा टणक प्रतिकार

 



कोल्हापूर, देवीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध. नुकताच नवरात्र महोत्सव थाटात पार पडला होता, पण काही "विशेष" खंडणीखोर पत्रकारांनी देवीच्या दर्शनाला काहीसा अनोखाच रंग दिला. यंदा महालक्ष्मी देवीच्या दर्शनाऐवजी "लक्ष्मी" मिळविण्यासाठी, कोल्हापूरातील सात-आठ उत्साही पत्रकारांनी एका प्लास्टिक व्यापाऱ्यावर लक्ष केंद्रित करत  साक्षात देवीशी युद्ध करणाऱ्या महिषासुर दैत्य  बनून त्याच्याकडून तीन लाखांची खंडणी मागितली.


साहजिकच, या पत्रकारांना वाटलं की, व्यापारी बिचारा आमच्या हुकुमाला नक्की मानेल. पण, हा प्लास्टिकचा व्यापारी तसं म्हणावं तर लोखंडासारखा टणक निघाला! त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. त्याच्याकडे पुरावा म्हणून दिलेला दुकानात गुप्तपणे लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे  फुटेज पोलिसांसमोर ठेवले, ज्यात हे पत्रकारमंडळी साक्षात "खंडणीचा परवाना" मागताना दिसत होते.


पोलीसांनी लगेचच खंडणीच्या महिषासुर दैत्यगणांवर कारवाई केली. मुख्य आरोपी अन्सार रफिक मुल्लासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. त्यातील तिघांना तर थेट गजाआड केलंय. बाकीचे अजूनही पोलिसांच्या नजरांमध्ये आहेत आणि लवकरच तेही त्यांच्या चकमक दर्शनाला सामील होणार आहेत.


यात एक विशेषत: नामांकित न्यूज चॅनलचा पत्रकारही सामील असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे चॅनल एका राजकीय नेत्याचं असल्याने, आता या नेत्याचे नाव बाहेर न येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा पत्रकार सध्या "मोबाईल बंद" करत एका गुप्त ठिकाणी पळून गेला आहे, जिथे तो 'सागरात' लपला असल्याचे बोलले जाते. पोलिसांच्या तपासात त्याला गुलगुले खाऊ घालणार की थेट लोखंडाचे कडे घालणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे!


कोल्हापुरात महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या "विशेष" भक्तगणांच्या कर्तृत्वावर चर्चा सुरू केली आहे. शहरात जिकडे तिकडे हाच विषय आहे की, आता हे पत्रकार कोणत्या देवीला पुन्हा भेटायला जाणार? देवाच्या नावाखाली पैशांचा खेळ करताना या मंडळींचा हा 'नवरात्र' उत्सव पूर्ण थाटात पार पडला, पण यामध्ये लक्ष्मी देवीने उधळलेली 'लक्ष्मी' मात्र गजाआडच राहणार, असं दिसतंय!


आता हे देवदूत पत्रकार आणि त्यांचा 'राजकीय आशीर्वाद' मिळालेला सहकारी यांचं पुढं काय होणार, हे पाहण्यासाठी सगळं कोल्हापूर शहर उत्सुक आहे. एका प्लास्टिक व्यापाऱ्याने देवीच्या या भक्तगणांना जणू त्याच्याच तोडीला उतरवलं, आणि त्याने दिलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी आता या पत्रकारांना देवीचाच आशीर्वाद लागणार, हे मात्र खरं!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या