कधी काळी मराठी पत्रकारितेचा खरा गाभा म्हणजे निर्भिडता, परखडपणा आणि बिनधास्तपणे सत्य मांडण्याची धाडस होती. 'थेट, नेमकं, परखड आणि कुणाचाही कसलाही मुलाहिजा न ठेवणारं निर्भिड लेखन म्हणजे मराठी पत्रकारिता' असं लोक म्हणायचे. हे असं बोलण्यामागे कारण होतं पत्रकारांमध्ये असलेली तळमळ, अभ्यासू वृत्ती, आणि स्वतःला “Voice of the Voiceless” म्हणजे आवाज नसलेल्यांचा आवाज समजण्याची मानसिकता. पण आता, ही पत्रकारिता कुठे हरवलीय, हे कोणालाच कळेनासं झालंय.
आताची पत्रकारिता एकदमच वेगळी, आणि काही प्रमाणात हास्यास्पद बनलीय. आधीचं निर्भिडपण कुठेतरी हरवलंय आणि त्याची जागा "थातुरमातुर" आणि "भंपक" पत्रकारांनी घेतली आहे. आता सर्वत्र लाळघोटं, लोचट आणि लांगूलचालनाचं दृश्य पाहायला मिळतं. हळूहळू पत्रकारितेत लाडाची, पाळलेली वृत्ती रुजत चालली आहे. म्हणजे, पूर्वीची पत्रकारिता होती समाजासाठी आरसा दाखवणारी; आता त्याच आरशाला चकाकवलं जातंय, सत्ताधाऱ्यांनीच स्वतःला पाहण्यासाठी!
"पाळीव" पत्रकारितेचं चमत्कारीक चित्रण
आजच्या पत्रकारितेच्या काही नमुन्यांना पाहून असं वाटतं, "काय बातम्या वाचतोय की मोठ्या घरातील मुलाचं कौतुक?" हल्लीच्या काही पत्रकारांना पाहिलं की, ते कोणतं ही सत्य तपासायचं विसरून जाऊन फक्त सत्तेचं स्तुती गान गाताना दिसतात. एके काळी पत्रकार सत्तेला धारेवर धरायचे, प्रश्न विचारायचे आणि समाजाला जागं करायचे. पण आता, हेच पत्रकार “थोडं कमी बोला आणि जरा थोडं चाटून टाका” अशी भूमिका घेतात. त्यामुळे पत्रकारितेत एक प्रकारचं लोचटपण आलेलं दिसतं.
त्यात आता काही पत्रकार असतात, जे पूर्णपणे "पाळीव" बनलेले आहेत. यांचं काम म्हणजे केवळ आपल्या मालकाचं चाटणं, जे त्यांना कुठल्या तरी ताकदीच्या व्यक्तींच्या बाजूने वळवतात. जर एखाद्या नेत्याचं चांगलं काही असेल, तर ते आकाशात उचलून धरतात. पण एखादी त्रुटी दाखवायची वेळ आली, की तोंड दुसरीकडे फिरवतात. हळूहळू लोकांना हे समजतंय की, ही पत्रकारिता आता खरं सांगत नाही, फक्त मनोरंजन करते.
समाजाचे आरसा असलेले पत्रकार - आता काचफोड्या हास्यकार
आज पत्रकारिता फक्त विनोद करण्याचं साधन बनली आहे का, असा प्रश्न लोकांच्या मनात येतोय. काही पत्रकार आता अशा प्रकारे वागताहेत की ते समाजाला आरसा दाखवण्याचं विसरून गेले आहेत. ते ज्या गोष्टींवर लोंबकळत असतात, त्यातून एक गोष्ट समजते: आता पत्रकारिता असहाय्य, दीनवाणी झाली आहे. त्याच वेळी, तितकीच हास्यास्पदही झाली आहे.
एकेकाळी 'अवाज उठवणारी पत्रकारिता' म्हणून ओळखली जाणारी ही व्यावसायिकता, आता 'मालकांच्या हिताची पत्रकारिता' बनली आहे. समाजावर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येण्याऐवजी, ही पत्रकारिता आता त्यांच्या हातातील बाहुले झाली आहे. तात्पर्य, पत्रकार आता "पाळीव" बनले आहेत; ते त्यांच्या असली भावनेने काम करत नसून फक्त पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या नशेमध्ये बुडले आहेत.
परंतु, आशा अजून जिवंत आहे
सर्वत्र अशा प्रकारची पत्रकारिता पहाताना, अजून काही निर्भिड पत्रकार बाकी आहेत ज्यांनी स्वतःचा रस्ता बदलला नाही. त्यांनी सत्याची वाट सोडली नाही, ना त्यांनी आपलं धाडस गमवलं आहे. म्हणूनच, अजूनही थोडीफार आशा आहे की कधी तरी ही "पाळीव" पत्रकारिता पार्श्वभूमीत जाईल, आणि पुन्हा एकदा निर्भिड, थेट आणि आवाज नसलेल्यांचा आवाज बनलेली पत्रकारिता पुढे येईल.
-बेरक्या उर्फ नारद
0 टिप्पण्या