एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांत राडा



ठाणे:विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३० जागांसह घवघवीत यश मिळाले, पण मुख्यमंत्रीपदाच्या तिढ्याने महायुतीच्या आनंदात भर पडलीच नाही. या पार्श्वभूमीवर मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद ठाण्यात आयोजित करण्यात आली होती, पण या पत्रकार परिषदेतून शिंदे यांच्या बातम्यांपेक्षा दोन पत्रकारात झालेला राडा जास्त चर्चेचा ठरला. 

पत्रकार परिषद बुधवारी  दुपारी चार वाजता सुरू होणार होती. बातमीदार आणि कॅमेरामनचा महापूर शिंदे यांच्या बंगल्याकडे वळला. "मोठी बातमी हाती लागणार!" या आशेने मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमांतील पत्रकारांनी ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेचा बट्याबोळ केला. पण चारचे पाच वाजले तरी साहेब दिसेनात, आणि परिषद सुरू होईनाच!

यावेळी साहेबांच्या शुभदिप  बंगल्यात  दुसरीच सभा भरली होती. कॅमेरा कुठे लावायचा, कोण आधी बोलणार, कोणाला चांगला अँगल मिळणार यावरून पीटीआयचा कॅमेरामन एजाज सय्यद आणि एबीपी न्यूजचा पत्रकार वैभव परब यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले. एजाजने सौम्यपणे "थोडं सरक" असं सुचवलं, पण परब याने "माझ्या कॅमेऱ्यासमोर कोण आलं तर सणसणीत शिव्यांची राळ उडवतो!" असं जाहीर करून ठेवलं होतं. त्यात परब याचा मित्र उदय जाधव मध्ये  पडला आणि त्यानेही एजाज सय्यदवर दादागिरी सुरु केली. यावरून चांगलीच ब्रेकिंग न्यूज तयार झाली – परबच्या शिव्या चक्क टीव्ही ९च्या लाइव्हमध्ये ऑन  एयर ऐकू आल्या!

पोलिस हस्तक्षेपानंतर 'ब्रेकिंग तमाशा' थांबला जवळपास दहा मिनिटे सुरू असलेल्या या गोंधळामुळे साहेबांच्या बंगल्याबाहेरचा माहोल पार हलकल्लोळ झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून या 'लाईव्ह तमाश्या' ला पूर्णविराम दिला.

साहेबांचे लाडके पत्रकार, पण कोणाचे लाडके तमाशे? वैभव परब आणि न्यूज १८ लोकमतचा उदय जाधव हे साहेबांचे खास मानले जातात. पण परबने अशा राड्याने पत्रकारांची प्रतिष्ठा पार वेशीवर टांगली. "आपल्याच बंगल्यासमोर असले प्रकार घडले याबद्दल साहेब काय म्हणतील?" हा प्रश्न आता पत्रकारांपेक्षा साहेबांच्या शेजाऱ्यांना जास्त चिंताजनक वाटतोय.

बातमी न मिळाल्याचा राग, पण तमाशेने समाधान! या गोंधळामुळे पत्रकार परिषदेतील मोठ्या बातमीऐवजी 'महायुतीतील तमाशा' आणि 'पत्रकारांचं पाणीपाणी' हेच हेडलाईन्स मिळाले. शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद उशिरा सुरु झाली  आणि पत्रकारांनी रेकॉर्डवर "आज मोठा स्कोप नाही, उद्या बघू" असा स्टेटमेंट देऊन आपले कॅमेरे आवरले.

व्हिडीओ पाहा 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या