छत्रपती संभाजीनगरमध्ये 'सकाळ'च्या पत्रकारावर हल्ला


छत्रपती संभाजीनगर: सिडको परिसरात बुधवारी दुपारी एका पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'सकाळ'चे पत्रकार अजय हरणे हे वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर बातमी कव्हर करत असताना काही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

हरणे हे महाविद्यालयासमोर काही मुलांना मारहाण होत असल्याची बातमी कव्हर करत होते. त्यांनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली असता काही जणांनी त्यांना अडवले. "तुम्ही आमचे फोटो का काढता?" असे म्हणत त्यांनी हरणे यांच्याशी वाद घातला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत जमिनीवर आपटून फोडला. एवढेच नव्हे तर त्यांची मोटारसायकलचेही नुकसान केले. हल्लेखोरांनी हरणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

या घटनेची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या