बीडच्या पत्रकारांची कहाणी: मुंबईच्या पत्रकारांनी लावलेल्या 'आगीत' स्थानिक पत्रकार होरपळले!


बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मीक कराड यास अटक झाल्यानंतर बीडमधील पत्रकारांच्या आयुष्यात नवा 'सांस्कृतिक वादळ' आलंय. मुंबईतून आलेल्या पत्रकारांनी बीडचं चित्र बिहारसारखं रंगवलं, पण पळ काढल्यावर स्थानिक पत्रकारांच्या माथी हे सर्व पाप फोडलं गेलंय. "आम्ही काय बॉ बिहारमध्ये पाय रोवले का?" असं म्हणत पत्रकार संताप व्यक्त करत आहेत.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकारांना दोष देत डोळे वटारल्याने परिस्थिती आणखी गंभीर झालीय. त्यातच बीड ते मस्साजोग  येरझाऱ्या मारणाऱ्या पत्रकारांना कंपनी पैसे देत नाही, आणि वरतून लोकांच्या नजरेत 'दुष्मन' ठरत असल्याने अनेक जण दिवसभर पेनऐवजी डोके खाजवत आहेत.

स्ट्रिंगरचा 'जळजळीत' अनुभव

Zee News च्या स्ट्रिंगरने तर वैतागून काम सोडलंय.आणखी एका चॅनलचा  स्ट्रिंगरसुद्धा वैतागला असून, "डेस्कवर बसून तयार केलेल्या निगेटिव्ह बातम्यांना माझं नाव का लावताय?" असा सवाल करताना दिसतोय. मेहनत करून बातम्या पाठवली तरी नाव लागत नव्हतं, पण आता न पाठवलेल्या बातम्यांनाही त्यांचं नाव लागत असल्याने 'फायनल निघायचं' का, याचा विचार सुरू आहे.

मीडिया ट्रायलमुळे पत्रकारांची 'भारी फजिती'

मीडिया ट्रायलमुळे काम कसं करायचं, हा प्रश्न स्थानिक पत्रकारांना पडला आहे. एकीकडे मराठा आणि ओबीसी वादाने लोक धमक्या देत आहेत, तर दुसरीकडे ऑफिसकडून सतत बातम्या पाठवण्याचा दबाव आहे. "आम्ही रिपोर्टिंग करायचं की वाचनालय सुरू करायचं?" असा सवाल काही पत्रकार करत आहेत.

सामूहिक राजीनाम्याची कुजबुज

गर्दीत कुणाला ओळखता येत नाही तसा हल्ली पत्रकारही ‘वाटेवर’ दिसत नाहीत. मुंबईच्या पत्रकारांनी लावलेल्या आगीत बीडच्या पत्रकारांना नाकी नऊ येत असून, काही जणांनी ऑफिसला अडचण स्पष्ट कळवली आहे. "सगळ्यांनी सामूहिक राजीनामा द्यायचा का?" अशी चर्चा चहा टपरीवर रंगली आहे.

म्हणजे काय, बीडमध्ये ‘आग’ मुंबईने लावली, धूर पत्रकारांनी ओढला, आणि आता विझवायचंही त्यांनाच आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या