टीव्ही चॅनल रिपोर्टरची 'लाइव्ह' खडाजंगी: आंदोलनापेक्षा कॅमेरा युद्ध रंगात


छत्रपती संभाजीनगर- महायुती सरकारने 15 टक्के एसटी तिकिट दरवाढ जाहीर करताच, ठाकरे शिवसेनेने राज्यभर गाड्या थांबवून आंदोलनाचा ब्रेक मारला. छत्रपती संभाजीनगरात या आंदोलनाचा थरार चांगलाच गडगडला, कारण तिथे खुद्द विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मैदानात उतरले.

सुरुवातीला आंदोलन शिस्तबद्ध सुरू होतं, पण मजा आली ती लाइव्ह कव्हरेजमध्ये. टीव्ही 9 मराठीचे ब्युरो रिपोर्टर दत्ता कानवटे सरळ लाइव्ह कव्हरेज करत होते, पण न्यूज 18 लोकमत आणि झी 24 तास यांच्या कॅमेर्‍यांनी "आडवा ये, अडवा ये" चा खेळ सुरू केला. हे कॅमेरे कोणते आंदोलन शूट करत होते, हे त्यांनाच कळेना, पण कानवटे साहेबांचे लाइव्ह मात्र चांगलेच डिस्ट्रर्ब झाले.

कॅमेऱ्यांमुळे निर्माण झालेल्या "अडथळ्याच्या शर्यतीत" रिपोर्टरांनी एकमेकांवर शब्दांचे वारे सोडले. "आमचा कॅमेरा आधी!", "तुम्ही बाजूला व्हा!" अशा आरोळ्या आंदोलनाच्या घोषणांना पार झाकोळून टाकत होत्या. काही क्षणांनी ही खडाजंगी आंदोलनाचं मुख्य आकर्षण ठरली.

आता, एसटी दरवाढीवर कोणाची चर्चा व्हावी? इथं तर "कॅमेरा कोणाचा मोठा?" हाच विषय महत्त्वाचा ठरला. आंदोलनात सहभागी नेत्यांपेक्षा चॅनलचे प्रतिनिधीच जास्त आक्रमक असल्याचं दृश्य लोकांनी अनुभवलं.

शेवटी, कॅमेरा आणि आंदोलनाचा हा संग्राम पाहून जनता म्हणाली, "एसटीचा विषय जाऊ द्या, आता चॅनलवाल्यांची कुस्ती बघायला तिकीट काढा!"

व्हिडीओ पाहा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या