इंदापूरमध्ये पत्रकारितेच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा धंदा, पोलिसांनी पाच जणांना ओढलं रडारवर!

 

पत्रकारितेचा खिसा गरम करण्यासाठी नवनवीन कल्पना लढवणाऱ्या काही स्वयंघोषित पत्रकारांना आता पोलिसांच्या चौकशीच्या पंखाखाली येण्याची वेळ आली आहे. इंदापूर आणि दौंड तालुक्यातल्या पाच जणांच्या मायक्रो-माफिया मीडिया ग्रुप वर अखेर पोलिसांचा डोळा पडला असून, युट्युब आणि पोर्टलच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगचा 'व्यवसाय' करणाऱ्यांना चांगलीच झापड बसली आहे.

पत्रकारिता की धंदा?

हातात माईक, गळ्यात आयकार्ड आणि खिशात रंगीत नोटांची स्वप्नं! ही मंडळी पत्रकारितेच्या नावाखाली ठेकेदार, हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या मोठ्या उद्योजकांना अक्षरशः छळत होते. पुणे-सोलापूर महामार्गावरच्या एका लॉज मालकाचा संयम सुटला आणि त्याने थेट कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली.

बोलावून घेतलं आणि कागदावर शिकवणी!

भिगवण पोलिसांनी दोघा महिलांसह पाच जणांना बोलावून घेतलं. पण चौकशीनंतर पोलिसांनी फक्त समज दिली आणि "यापुढे असलं काही करू नका" असं सांगून 'लेखी जबाब' घेतला. आता हा जबाब म्हणजे 'पत्रकारितेचा आचारसंहिता' आहे की 'गुप्त धमकी' हे गुलदस्त्यातच राहिलं!

इतिहासही तगडाच!

या टोळीतील काही जणांवर यापूर्वीही खंडणी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दौंड तालुक्यातील एका महाशयावर माती चोरी आणि मुरुम चोरीचे आरोप आहेत, शिवाय हा शासकीय अधिकाऱ्यांना 'चिरीमिरी' साठी तगादा लावतोय. थोडक्यात, पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या खासगी चौकशी विभागाचं भंडाफोड झालंय!

पोलिसांनी फिर्याद द्यावी का?

आता मोठा प्रश्न असा आहे की, पोलिसांनी स्वतःच या मंडळींवर खंडणीचा गुन्हा दाखल करायचा का? की पुन्हा 'लेखी समज' पुरेशी ठरणार? कारण ‘पत्रकारितेच्या ढालीमागे लपून’ काही लोक "रिपोर्टिंगच्या नावाने वसुली" हा 'साईड बिझनेस' जोरात करत आहेत.

बेरक्या बोलतो...

"पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे," हे पुस्तकात वाचलं होतं, पण काही मंडळींनी याला ‘वसूलीचा चौथा धंदा’ बनवलंय. पोलिसांनी यात किती गंभीरता घेतली, कोणावर केस होणार, की सगळं ‘जुना सिनेमा’ ठरणार, हे पाहणं रंजक ठरेल!

  • बेरक्या उर्फ नारद
    (नजर तिरकी, पण नेम अचूक!)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या