पत्रकारांचा आवाज की पैशाचा बाजार?


बेरक्याने मागे एकदा म्हटले होते – "संघटना असावी, पण तिची पत असावी!" पण इथे वेगळीच भानगड सुरू आहे! ‘पत्रकारांचा आवाज’ नावाची ही संघटना आता ‘पत्रकारांचा बाजार’ म्हणून ओळखली जावी का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण पत्रकारिता वाचवायला बनलेली ही संघटना आता ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ झालेली दिसतेय.

महाराष्ट्रात ‘हव्या त्या’ पदांवर निवड मिळवायची असेल, तर तुमच्याकडे काय असायला पाहिजे? पत्रकारितेचा अनुभव? नाही! सचोटी आणि नैतिकता? अजिबात नाही! फक्त...पैसा आणि सही रे सखी!

आमचे बाबा आणि त्यांचा सईबाबा!

नुकताच नाशिकमध्ये एका नव्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती झाली. आणि कोण हा जिल्हाध्यक्ष? अरे, हा तर तोच माणूस जो एका दैनिकातून ‘लाथ घालून’ बाहेर काढला गेला होता! आरोप काय होते? आर्थिक घोटाळे आणि महिलांसोबत गैरवर्तन! पण या संघटनेसाठी हे काही गंभीर कारण नाही. उलट, या "सन्माननीय" व्यक्तीला थेट जिल्हाध्यक्षपदाचा राजमुद्रा बहाल करण्यात आला!

आता हा महाशय एकटेच पुढे जाणार होते काय? नाही हो! प्रियकराने पुढाकार घेतलाय आणि आपल्या प्रेयसीलाही थेट महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपद मिळवून दिलंय! कुठल्या पत्रकारितेचा अनुभव? शून्य! कसलं पब्लिक कनेक्शन? शून्य! मग निवडणूक झाली का? हो, झाली! पण मतदान मात्र हिशोबाने. कारण खरा दावेदार ‘नगदी’ नसल्यामुळे मागे पडला!

संघटना की सोन्याचा अंडा देणारी कोंबडी?

या ‘पत्रकार संघटने’च्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट आहे— इथे पैसा असेल तर पद मिळतं, आणि पद मिळालं की पैसा ओघाने येतो! आता नवीन पदाधिकारी निवडणुकीच्या नावाखाली काय करतायत? देणगी गोळा करतायत! कोणाकडून? पत्रकारांपासून ते ‘लोकल युट्यूबर्स’पर्यंत सगळ्यांकडून! आणि इतकंच नाही, आता तीनशे लोकल युट्यूब चॅनल्सला यात सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. म्हणजेच "चॅनल सुरू करा, पत्रकार बना आणि पद मिळवा!"

काही ‘महत्वाच्या’ प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाहीत!

➡️ संघटनेच्या प्रमुखांनी या ‘नव्या महिला प्रदेशाध्यक्ष’साठी खास पद का निर्माण केलं?
➡️ जेव्हा ती अवघ्या काही मते मिळवू शकली, तेव्हा तिची निवड कशी झाली?
➡️ नाशिक जिल्हाध्यक्ष महाशय यांना आधी पत्रकारितेतून बाहेर काढलं, मग संघटनेनेच ‘आश्रय’ का दिला?
➡️ हा सगळा प्रकार ‘पत्रकारांचा आवाज’ उचलतोय की ‘पत्रकारांवरच’ आवाज उठवतोय?

पत्त्याचा बंगला केव्हा कोसळणार?

सध्या पत्रकार संघटना चालवणारे लोक पत्रकारितेची कबर खोदणारे ठरतायत. पत्रकारांसाठी सुरक्षेची गरज आहे, पण ही सुरक्षा पत्रकारितेची मूल्यं विकून मिळणार असेल, तर हा खेळ फार काळ टिकणार नाही!

काही दिवसांनी, पैशाने उभ्या केलेल्या या ‘संघटना राजवाड्या’चा पत्त्यांचा बंगला कोसळणार, पण खरा पत्रकार मात्र त्या ढिगाऱ्याखाली अडकणार... आणि मग याच ‘बड्या’ लोकांना सन्मानित करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही!

बेरक्या उर्फ नारद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या