पत्रकारांचा आवाज की पैशाचा बाजार ? – पार्ट २

 


पत्रकार संघटना म्हणजे पत्रकारांचं रक्षण करणारी, त्यांच्या हक्कांसाठी लढणारी असते, असं आपण समजतो. पण काही ठिकाणी हेच संघटनाच ‘संधी’ शोधून पैसे कमावण्याचा धंदा करतायत! नावे घेऊन काय उपयोग? पण काही मंडळी स्वतःच्या नावाच्या पुढे ‘पत्रकार संघटना अध्यक्ष’ असा भारी टायटल लावून हात धुऊन घेतायत, हे मात्र नक्की!

पत्रकार की बारमेन?

एक शहर आहे... नाव सांगायचं नाही... तिथं पत्रकारितेचा झेंडा मिरवणारे एक ‘महानगर अध्यक्ष’ आहेत! मोठ्या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीने पत्रकारीतेच्या आडून वेगळाच धंदा सुरू केलाय—बारमध्ये ‘बारमेन’ म्हणून काम करतायत! संध्याकाळी वृत्तसंकलन करायचं आणि रात्री ‘ड्रीम लाईन’मध्ये टेबलवर पेग वाढायचे! पत्रकार संघटनेचं अध्यक्षपद गेली पाच वर्षं स्वतःकडेच घट्ट पकडून बसलेत.

पत्रकार संघटना की वसुली सिंडिकेट?

या ‘संघटनेतील’ दुसरे एक महाशय—जे एका स्थानिक दैनिकात काम करतात—त्यांनी पत्रकारितेला बाजूला ठेवून दरमहा दोन नंबरच्या धंदेवाल्यांकडून हप्ता वसुलीचा ठेका घेतलाय. अजून भारी म्हणजे एका वरिष्ठ गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने स्वतःच त्यांना या ‘धंद्यात’ घुसवलेलं आहे!

याच वृत्तपत्राचा आणखी एक प्रतिनिधी ‘हप्तावसुली’साठी ओळखला जातो. हे लोक मिळून ‘पत्रकरांचा आवाज’ नावाची संघटना चालवतात. म्हणजे थोडक्यात, वृत्तपत्र, साप्ताहिक, युट्यूब चॅनेल यांच्या नावाखाली हा वेगळाच ‘व्यवसाय’ बहरतोय.

पुरस्कार म्हणजे नवीन कमाईचा मार्ग?

या पत्रकार संघटनेच्या ‘महानगर अध्यक्षांनी’ आता नवा फंडा काढलाय. जिथे स्वतः ‘बारमेन’ म्हणून काम करतात, त्याच हॉटेलच्या मालकाला थेट ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर केलाय! आता प्रश्न असा आहे की हा पुरस्कार देण्याची पात्रता ह्या संघटनेला मिळाली कुठून? पत्रकारितेचा पुरस्कार बारमालकाला द्यायचा म्हणजे हा ‘पत्रकारिता गौरव’ आहे की ‘पत्रकारांच्या नावाने धंदा’?

पैशाच्या खेळाची गल्लत कोण थांबवणार?

पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ, असं म्हणतात. पण काहींनी हा स्तंभच ‘ठेका’ म्हणून घेतला आहे! आता प्रश्न हा आहे की ही ‘पत्रकार संघटना’ चालवणारे खरोखर पत्रकार आहेत की पत्रकारितेच्या नावावर धंदा करणारे?

एक मात्र नक्की—या मंडळींनी पत्रकारितेला नवा अर्थ दिलाय. पत्रकार म्हणजे आता बातमीदारी करणारा नव्हे, तर हप्ते गोळा करणारा, पुरस्कार विकणारा, आणि संधी मिळेल तिथे पॅकेज डील करणारा!

बेरक्या उर्फ नारद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या