सोलापूर: पत्रकारितेत अनेकांनी नवनवीन प्रयोग करून दाखवले आहेत. पण एका धाडसी पत्रकाराने तर चक्क नवी 'उद्योग' शाखा सुरू केली – "व्हिडिओ डिलीट सेवा"! विशेष म्हणजे, ही सेवा पोलीस विभागासाठी खास सवलतीच्या दरात होती – फक्त 50 हजार रुपये!
गुन्हेगारी विश्वात पैसे देऊन व्हिडिओ डिलीट करण्याच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण इथेच एक भन्नाट ट्विस्ट आला. सोलापूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सुनिल धुलचंद चौधरी यांनी 1 फेब्रुवारी रोजी एक कारवाई केली. ही कारवाई बघताच पत्रकार आकाश इंगळे यांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला. पण एवढ्यावरच तो थांबला नाही! त्यानंतर थेट चौधरी यांनाच धमकी दिली – "हा व्हिडिओ डिलीट हवा? मग 50 हजार रुपये काढा!"
हा प्रकार ऐकून पोलीस कर्मचारी काही क्षण गोंधळले असतील. कारण नेहमी पोलिसांना पैसे मागणाऱ्या लोकांना अटक करायची सवय असते, पण इथेच कटाक्षाने उलट गणित बसले होते! व्हिडिओ पुसायचा, आणि त्यासाठी पोलिसालाच पैसे द्यायला लावायचे – हे गणित काही वाहतूक पोलिसांच्या समजण्यापलीकडे गेले.
पण आमच्या 'स्मार्ट' पोलिसांनी लगेच सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. लगेचच आरोपी आकाश इंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्याचा पुढील तपास सुरू झाला.
पत्रकारितेचा अनोखा 'उद्योग'
आकाश इंगळे हा पी.आर. न्यूजचा पत्रकार असल्याची माहिती मिळाली आहे. एका पत्रकारानेच पोलिसांना 'रिव्हर्स हप्ता' मागितल्याची ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. "संपादकांना धड पगार मिळत नाही, आणि इथे तर पत्रकारच पैसे मागतोय!" अशी मिश्कील चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली आहे.
हा प्रकार पाहून आता सर्वसामान्य नागरिकांनीही विचार सुरू केला आहे – "एवढेच पैसे देऊन व्हिडिओ डिलीट होणार असतील, तर मग गुप्त खाते, पासवर्ड आणि फिंगरप्रिंट लॉकची गरजच काय?"
0 टिप्पण्या