यवतमाळच्या कंत्राटदारांनी आपल्या आर्थिक अडचणींचा गळा काढण्यासाठी एकीकडे शासनाविरोधात हॉटेलमध्ये बैठक ठरवली, तर दुसरीकडे काही 'निवडक' पत्रकारांसाठी रानमळ्यात गिफ्टस्नेह सोहळा रंगवला! यामुळे कंत्राटदारांच्या नियोजन कौशल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शासकीय निधी टपक्याटपक्या मिळत असल्याने कंत्राटदार चांगलेच कंगाल झालेत. यावर उपाय म्हणून त्यांनी सरकारला ताकद दाखवायची ठरवली. पण प्रत्यक्षात ताकद दाखवायच्या आधीच 'गिफ्ट दाखवणे' निवडले!
'लाड' मोहीम अन् पत्रकारांच्या 'चिऊ-चिऊ' गप्पा
यवतमाळच्या जामरोडवर एका रमणीय ठिकाणी काही पत्रकारांसाठी खास स्नेहभोजन आणि गिफ्टसंध्या ठेवण्यात आली होती. B&C च्या 2700 कोटींच्या कामांसाठीच हा ‘पोळा’ भरवला गेला, असं बोललं जातं!
तासभरात पत्रकारांच्या हातात 'विशेष गिफ्ट' आल्यावर 'पत्रकार हित' की 'कंत्राटदार हित'?' असा प्रश्न उपस्थित झाला. पत्रकारांमध्ये काहींना लाड मिळाला, तर काहींना फक्त बातमी मिळाली! त्यामुळेच ज्या पत्रकारांना गिफ्ट मिळाल्या त्यांनी मख्ख चेहऱ्याने हसण्याचा प्रयत्न केला, तर ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांनी 'हे आमच्याशी अन्याय!' असं म्हणायला सुरुवात केली.
'पत्रकार एकता' कुठं गेली?
या गिफ्ट-स्नेहसोहळ्यामुळे पत्रकारांमध्ये 'एकजुटीची' नवी फूट पडली आहे. काहींनी पत्रकारितेच्या निस्पृहतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं, तर काहींनी गिफ्ट स्वीकारणाऱ्यांना 'धाडसी पत्रकार' घोषित केलं!
'बैठकी'त कमी गर्दी, 'रानमेळ्यात' जास्त रंगत!
गंमत म्हणजे, दुसऱ्या दिवशी हॉटेल जसराजमध्ये कंत्राटदारांनी शासकीय निधीबाबत बैठक घेतली खरी, पण तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या चेहऱ्यावर 'कालचा हँगओव्हर' स्पष्ट दिसत होता. काहींनी कंत्राटदारांवर संताप व्यक्त करत 'अरे, सगळ्यांसाठी गिफ्ट ठेवायला काय गेलं होतं का?' असा सवाल केला!
पत्रकारांसाठी गिफ्ट ठेवणं म्हणजे पत्रकारितेची 'सुगंधी वडी' वाटणं नव्हे!
या गिफ्टवाटप प्रकरणामुळे कंत्राटदारांची उधारी जशी वाढली, तशी पत्रकारांच्या 'विश्वासार्हतेची' घसरणही झाली. आता पुढच्या वेळी पत्रकारांसाठी ‘सर्वसमावेशक’ गिफ्ट ठेवली जाणार की पत्रकार स्वतःलाच ‘निर्भीड’ म्हणवत गिफ्ट घेणं टाळणार? हे पाहणं मनोरंजक ठरेल!
0 टिप्पण्या