बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने नुसता गदारोळ माजवलाय! ९ डिसेंबरला झालेल्या या हत्याकांडानंतर मागील तीन महिने सतत बातम्या धडकतायत. आंदोलनं, अटक, राजीनामा आणि राजकीय गदारोळ – हे प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाही. पण या सगळ्यात मोठा फटका बसतोय न्यूज चॅनलच्या रिपोर्टरांना!
टीआरपीच्या हव्यासात चॅनलवाल्यांना ‘ब्रेकिंग न्यूज’ लागते, पण रिपोर्टर मात्र जळताहेत. त्यांना पाठवलेल्या बातम्या ऑन-एअर जात नाहीत, आणि टेबलवर बसून ‘मसालेदार’ बनवलेल्या बातम्या मात्र त्यांच्या नावाने खपवल्या जातात. वरून ब्युरोची दहशत – ‘बातमी मिळवा नाहीतर बाहेर व्हा’ – अशा दबावामुळे रिपोर्टर वैतागलेत.
राजीनाम्यांची मालिका सुरूच – ABP माझाचे रिपोर्टरही झाले बळी!
याच तणावाखाली काम करणाऱ्या एबीपी माझाचे बीड रिपोर्टर गोविंद शेळके यांनी अखेर राजीनामा दिला आहे. कामाचा ताण, ब्युरोचा मानसिक त्रास, सततची धावपळ आणि ‘टीआरपी मशीन’ बनण्याचा तगादा – शेळके यांना हे सगळं सहन न झाल्यामुळे त्यांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतला.
शेळके यांनी खरं तर आपली निवृत्ती १ डिसेंबर रोजीच घोषित केली होती. पण नंतर संतोष देशमुख हत्याकांड घडलं आणि त्यांनी ऑफिसच्या आग्रहास्तव साडेतीन महिने काम केलं.
‘मसाजोग’च्या प्रवासाने रिपोर्टर थकले!
बीड ते मसाजोग हे ४५ किलोमीटरचं अंतर म्हणजे रिपोर्टरांसाठी ‘नोकरी का दफनभूमी?’ असा प्रश्न निर्माण झालाय. रोजचा ९० किलोमीटरचा प्रवास, दिवसभर धावपळ, आणि वरून ‘बातमी मिळवली नाही’ म्हणून दडपशाही – या सगळ्यामुळे तीन रिपोर्टर आधीच बळी गेले होते.
गेल्या काही दिवसांतच नोकऱ्या गमावलेले रिपोर्टर:
- साम: विनोद जिरे गेले, नवा रिपोर्टर योगेश काशीद
- झी २४ तास: विष्णू बर्गे हटले, नवा रिपोर्टर विकास माने
- जय महाराष्ट्र: उद्धव मोरे हटले, नवा रिपोर्टर अमीर हुसेन
- टीव्ही ९ मराठी: महेंद्रकुमार मुधोळकर यांच्या नोकरीवरही टांगती तलवार
आणि आता एबीपी माझाचे गोविंद शेळके यांनीही कामाचा ताण सहन न झाल्याने राजीनामा दिला आहे.
जातीय वादात पत्रकारांची नोकरी धोक्यात?
बीड जिल्ह्यात वंजारी विरुद्ध मराठा हा वाद आधीच तापलेला. त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी चिघळली. वाल्मिक कराड यांची अटक, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामानंतर आता खोक्या उर्फ सतीश भोसले याचं प्रकरण गाजत आहे. यामुळे बीड बरोबर पत्रकारही बदनाम झालेत.
या वादात खरं तर राजकारण पेटलंय, पण पत्रकार मात्र धगधगताहेत. याला पत्रकारिता म्हणायचं की बळी देण्याचा खेळ?
मसाजोग प्रकरणाचा शेवट काय होईल, हे कोणालाही ठाऊक नाही. पण टीआरपीच्या हव्यासात अजून किती रिपोर्टर नोकऱ्या गमावतील, हा मोठा प्रश्न आहे!
0 टिप्पण्या