गौरव अहुजा प्रकरण : पत्रकारिता की ‘पेड दलाली’?

 


सातारच्या काही पत्रकारांनी पत्रकारितेचा पाया असा हादरवून टाकावा, हे फारच दुर्दैवी! पुण्यात लाखोंची बीएमडब्ल्यू उभी करून खुलेआम अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव अहुजा कराडमध्ये जाऊन लपला, आणि त्याला वाचवण्यासाठी सातारच्या काही पत्रकारांची धडपड सुरू झाली. पण कहर म्हणजे एका पत्रकाराने तर ‘काय सांगशील, गौरव दादा?’ अशी विचारणा करत स्वतःच्या पत्रकारितेची अब्रू लिलावाला काढली.

गौरव अहुजा प्रकरणाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असलेल्या पत्रकारितेने आरोपीला वाचवण्यासाठी इतका खटाटोप करावा? गुन्हेगाराचे पोलीस स्टेशनमधील ‘सरेंडर’ वेळापत्रक एखाद्या पत्रकाराला माहिती असावे? एवढेच नाही, तर तो पत्रकार स्वतः आरोपीच्या संपर्कात असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकांच्या मनात या पत्रकारांच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सातारच्या पत्रकारांची ‘स्पेशल मिटिंग’ आणि ‘जोडे बाहेर’ ठेवून चर्चा!

गौरव अहुजाला वाचवण्यासाठी सातारच्या काही पत्रकारांनी विशेष बैठक घेतली, तीही बंद दाराआड! गंमत म्हणजे या ‘स्पेशल मिटिंग’साठी जोडे बाहेर काढण्याची सक्ती होती. आता हे गुन्हेगाराला वाचवण्यासाठी होते की अजून काही, हा मोठा प्रश्न आहे. पत्रकारितेच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या या प्रकारावर आता संपूर्ण महाराष्ट्रातून टीका होत आहे.

पत्रकारिता की दलाली? नागरिकांचा संताप!

गौरव अहुजाला सातारच्या ज्या पत्रकारांनी मदत केली, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जनतेतून होत आहे. काही पत्रकारांची पत्रकारिता संपून ‘संरक्षण दलालगिरी’ सुरू झालीय, अशी टीका केली जात आहे. सोशल मीडियावर नागरिक आक्रमक झाले असून, "एखादा गुन्हेगार ‘दादा’ बनतो, आणि पत्रकार ‘शिष्य’!" अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पत्रकारांचा गौरव, की गौरवचे पत्रकार?

सातारच्या काही पत्रकारांनी गौरव अहुजाच्या मदतीसाठी केलेला खटाटोप म्हणजे संपूर्ण पत्रकारितेच्या नाकर्तेपणाचा ठळक नमुना आहे. चौथ्या स्तंभाने लोकशाहीचा कणा मजबूत करावा, की गुन्हेगारांचे लांगूलचालन करावे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

गौरव अहुजाला सरेंडर करण्यासाठी मदत करणाऱ्या पत्रकारांची सखोल चौकशी होणार का? की पुन्हा एकदा पैसेवाल्यांची ‘पत्रकार गँग’ यशस्वी होईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या