सांगोला - हॉस्पिटलची जागा बिगर शेती करून देतो असे म्हणून ६ लाख ७१ हजार रुपये घेतले; परंतु जागा बिगर शेती केली नाही तसेच घेतलेले पैसेही परत केले नाहीत. उलट "मी पत्रकार आहे, तुमच्या हॉस्पिटलची बातमी पेपरमध्ये छापून बदनामी करतो" अशी धमकी देऊन फसवणूक केल्याचा आरोप सांगोला येथील एका पत्रकारावर करण्यात आला आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालकांनी सांगोला शहरातील महुद रोड येथे १ हेक्टर ९ आर इतकी जागा हॉस्पिटलसाठी घेतली होती. या जागेवर हॉस्पिटल बांधण्यासाठी बिगर शेती करणे आवश्यक होते. यासाठी सांगोला येथील धनगरगलीतील जगन्राथ तुकाराम साठे यांच्याशी डॉ. शिवराज रामदास भोसले यांचा दि. २२ मे २०२२ रोजी तोंडी करार झाला. करारानुसार, जागा बिगर शेती करण्यासाठी साठे यांना ७ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
त्याप्रमाणे, दि. २४ मे २०२२ ते ८ एप्रिल २०२३ पर्यंत वेळोवेळी ६ लाख ७१ हजार रुपये रोख स्वरूपात साठे यांना देण्यात आले. मात्र, आगाऊ रक्कम मिळूनही साठे यांनी जागा बिगर शेती करण्याचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने वारंवार विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत काम टाळले.
दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी हॉस्पिटल प्रशासनाने साठे यांना नोटीस पाठविली. यामुळे संतप्त झालेल्या साठे यांनी "मी सांगोला येथील एका दैनिकाचा संपादक व पत्रकार आहे. माझे सहकारी पत्रकारांमार्फत तुमची आणि हॉस्पिटलची बातमी छापून बदनामी करीन" अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात जगन्राथ साठे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या