बीड जिल्ह्यात सध्या खोक्या भोसले प्रकरणाने धुमाकूळ घातलाय. गुन्हेगारी विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करणारा हा खोक्या, पोलिसांना काही सापडत नाही, पण टीव्ही 9 मराठीच्या रिपोर्टरला मात्र तो सहज मिळतो! हा फक्त योगायोग मानायचा की आणखी काहीतरी ‘विशेष’ चाललंय?
पोलिसांचा ‘खो’ आणि पत्रकारितेचा ‘क्या बात है’ मोमेंट!
खोक्यावर हरणाची शिकार, पैशांची उधळण आणि मारहाणीचे गंभीर आरोप आहेत. हे सगळं कळूनही तो ‘फरार’ आहे. पोलीस ‘तपास’ करत आहेत, पण काही सापडत नाही. आणि इकडे टीव्ही 9 मराठीचा रिपोर्टर अगदी आरामात त्याच्याशी संवाद साधतो! म्हणजे पोलिसांना हाती लागला नाही तो खोक्या, पण ब्रेकिंग न्यूजवाल्यांना तो एक्सक्लुझिव्ह कसा मिळतो?
मुलाखतीच्या नावाखाली गुन्हेगारीला क्लीन चिट?
खोक्याची मुलाखत बघून लोकांचा एकच प्रश्न – ही पत्रकारिता की गुन्हेगारीला ‘क्लीन चिट’ देण्याचा नवा उद्योग? एक फरार गुन्हेगार न्यूज चॅनेलवर येतो, स्वतःवरचे आरोप फेटाळतो आणि "मी सामाजिक कार्यकर्ता आहे" असं बिनधास्त सांगतो! म्हणजे गुन्हेगार स्वतःची प्रतिमा ‘साफ’ करून घेण्यासाठी मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकतो? मग उद्या दहशतवादीही येऊन सांगतील, "आम्हीही सामाजिक कार्यकर्तेच आहोत!"
पत्रकारिता की ‘पेड’ पब्लिसिटी?
या प्रकारामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो – पत्रकारिता आता सत्य शोधतेय की पेड पब्लिसिटीसाठी विकली जातेय? खरं तर, पोलिसांना जर खोक्या सापडत नसेल, तर त्यांनी आधी टीव्ही 9 मराठीच्या रिपोर्टरलाच ताब्यात घ्यावं आणि चौकशी करावी, की त्याला खोक्याचा पत्ता कुठून मिळाला?
गुन्हेगारांना माईक आणि कायद्यासमोर सायलेंस?
खोक्याच्या या मुलाखतीने एक गोष्ट स्पष्ट झाली – आता गुन्हेगारांना पळायची गरजच नाही, कारण त्यांना पकडणाऱ्यांपेक्षा त्यांचं इंटरव्ह्यू घेणारे जास्त तत्पर आहेत! न्यायव्यवस्था काही बोलण्याआधीच न्यूज चॅनेल त्यांना ‘प्लॅटफॉर्म’ देतात, तिथे ते स्वतःला निर्दोष ठरवतात आणि आपण ‘सामाजिक कार्यकर्ते’ असल्याची जाहिरात करतात!
‘ब्रेकिंग न्यूज’ महत्त्वाची की सत्य?’
पत्रकारितेचा उद्देश काय? सत्य लोकांसमोर आणणे की गुन्हेगारांना ‘फेअर चान्स’ देऊन त्यांची प्रतिमा सुधारणे? जर मीडिया अशा पद्धतीने गुन्हेगारांना प्लॅटफॉर्म देणार असेल, तर उद्या कोणत्याही गुन्हेगाराला न्यायालयाची गरजच काय? थेट न्यूज चॅनेलवर मुलाखत द्या, स्वच्छ प्रतिमा घ्या आणि समाजसेवक ठरवा!
खोक्याला ‘LIVE’ करणाऱ्या पत्रकारितेचा आज ‘DEAD END’ आलाय!
पत्रकारितेच्या नावाखाली चालणाऱ्या या ‘PR’ आणि ‘Damage Control’ तंत्राला जर आळा घातला नाही, तर उद्या प्रत्येक गुन्हेगार आपली प्रतिमा ‘सुधारण्यासाठी’ न्यूज चॅनेलवर हजेरी लावेल. मग न्यायव्यवस्थेची गरजच काय?
0 टिप्पण्या