"प्राजक्ता, तुम्ही जिंकलात!"—हे शब्द साधे नाहीत. न्यूज 18 लोकमतचे माजी संपादक प्रसाद काथे यांनी पत्रकारितेच्या रणांगणात लढलेल्या एका मोठ्या लढाईचा सारांश या शब्दांत मांडला आहे. सत्यासाठी झगडणाऱ्या एका पत्रकाराच्या विजयाची ही कहाणी आहे.
२०१७ साली, विधिमंडळाच्या वर्तुळात घडत असलेल्या "गैरव्यवहाराच्या" एका बातमीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली. विरोधी पक्षनेते प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात—हा आरोप छोटा नव्हता. पण हा आरोप हवा तसा सिद्ध करणं हे पत्रकारितेतील सर्वोच्च कसोटीचं काम होतं. प्राजक्ता पोळ यांनी ही जबाबदारी उचलली आणि आपली बातमी सिद्ध करण्यासाठी सर्व निकषांवर तपासणी केली.
'महागौप्यस्फोट' आणि धमक्यांचा पाऊस
बातमी सिद्ध झाली, न्यूज 18 लोकमतवर "महागौप्यस्फोट" हा शो प्रसारित करण्याचा निर्णय झाला. पण तेवढ्यात नवा ट्विस्ट—शो सुरू होण्याच्या काही मिनिटांआधी वृत्तनिवेदकाने काढता पाय घेतला! शेवटच्या क्षणी विलास बडे स्टुडिओत उतरले आणि त्यांनी हा प्रसंग लीलया हाताळला.
बातमी प्रसारित झाली, आणि राजकीय वर्तुळात तुफान पेटलं! विरोधी पक्षनेत्याने आरोप फेटाळले, बातमी खोटी असल्याचं सांगितलं, आणि चॅनलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. प्राजक्ता पोळ, विलास बडे आणि प्रसाद काथे यांना विधिमंडळात जबानी द्यावी लागली. हक्कभंग समितीसमोर उभं राहणं म्हणजे पत्रकारांसाठी एक युद्धपदकच!
सत्यावर शिक्कामोर्तब!
हक्कभंगानंतर कित्येक वर्षांनी, आता एका आमदारानेच हीच बाब मान्य केली आहे. म्हणजेच, प्राजक्ता पोळ यांची बातमी खरी होती! नियतीनं सत्याच्या बाजूने मोहर उमटवली आहे.
प्रसाद काथे यांनी या संपूर्ण आठवणींना उजाळा देताना, "भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नहीं" असं म्हणत नियतीने सत्याचा विजय ठरवलाच होता हे स्पष्ट केलं.
बेरक्याचा सवाल
- आज ती बातमी सत्य ठरली, मग पत्रकारांवर हक्कभंग का झाला?
- त्या वेळी धमक्या देणाऱ्यांनी आता माफी मागावी का?
- प्राजक्ता पोळ आणि विलास बडे यांच्यासारखे निर्भीड पत्रकार टिकावेत यासाठी मीडिया हाऊसेस काय करणार?
सत्याला वेळ लागते, पण त्याचा विजय अटळ असतो! प्रसाद काथे, प्राजक्ता पोळ, विलास बडे आणि सत्यासाठी उभे राहणाऱ्या सर्व निर्भीड पत्रकारांना सलाम!
0 टिप्पण्या